बीड | चिथावणीखोर वक्तव्य आणि बसवर दगडफेक प्रकरणी महारष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परळी कोर्टाने राज ठाकरेंविरोधातला अजामीनपात्र वॉरंट रद्द केला आहे. राज यांना दिलासा मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांनी कोर्टाच्या परिसरात एकच जल्लोष केला. चिथावणीखोर वक्तव्य आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसवर केलेल्या दगडफेक प्रकरणी तारखेला सतत गैरहजर राहिल्याने परळी न्यायालयाने राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्या प्रकरणात जामीन घेण्यासाठी राज ठाकरे हे परळी कोर्टात हजर झाले होते.
कोर्टाने राज ठाकरे गैरहजर का असल्याबद्दल विचारणा केली. राज ठाकरे हे मध्यंतरी रुग्णालयामध्ये होते, याची माहिती राज यांच्या वकिलांनी दिली. त्यानंतर कोर्टाने 500 रुपयांचा दंड ठोठावत वॉरंट रद्द केलं आहे. 2008 मध्ये राज ठाकरे यांना एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आल्यांनतर या अटकेचे पडसाद परळीतही उमटले होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केल्यानंतर मनसेच्या कार्यकत्यांवर आणि राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर राज ठाकरे परळीच्या न्यायालयात तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. या पूर्वी ३ आणि १२ जानेवारीला राज ठाकरेंना परळी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. परंतु, काही कारणामुळे ते येवू शकले नव्हते. मात्र, आज राज ठाकरे हे कोर्टात हजर झाले आणि अवघ्या काही मिनिटामध्ये कोर्टाने वॉरंट रद्द केला आहे. पुढील सुनावणी ही 23 जानेवारीला होणार आहे.