मान्सून अपडेट : मान्सून केरळमध्ये १ जूनपर्यंत पोहोचणार

मान्सून अपडेट : मान्सून केरळमध्ये १ जूनपर्यंत पोहोचणार

Monsoon News : मान्सून केरळमध्ये १ जूनपर्यंत पोहोचणार

मान्सूनच्या केरळमधील आगमनाचा सुधारित अंदाज जाहीर

आधी मान्सून २७ मे पर्यंत केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता

नवी दिल्ली : मान्सून केरळमध्ये १ जूनपर्यंत पोहोचणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आधी मान्सून २७ मे पर्यंत केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. पण वातावरणातील बदलांचा आढावा घेऊन हवामान विभागाने मान्सूनच्या केरळमधील आगमनाचा सुधारित अंदाज जाहीर केला आहे.

भारताच्या हद्दीत अंदमानमध्ये मान्सून आला आहे. मान्सूनचा पुढील प्रवास दक्षिण पश्चिम मार्गाने अरबी समुद्राकडे सुरू आहे. सध्या वाऱ्याची स्थिती अस्थिर दिसत आहे. वाऱ्याचा वेग आणि दिशा यात स्थैर्य आले आणि वाऱ्यांचा वेग वाढला की मान्सून पुढे सरकू लागेल. यामुळेच मान्सून १ जूनपर्यंत दाखल होईल, असे हवामान विभागाने सांगितले.

हवामान विभागाने केरळमध्ये मान्सून २७ मे पर्यंत दाखल होईल असे सांगत निवडक जिल्ह्यांना २९ मे पर्यंत ‘यलो अलर्ट’ दिला होता. हा अलर्ट मागे घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. काही ठिकाणी जोरदार वारे वाहतील आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या किरकोळ सरी पडतील.

पुढील ४८ तासांत दक्षिण पश्चिमेचा मान्सून दक्षिण पश्चिमेला अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये तसेच दक्षिण पूर्वेला अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये आणि मालदीव, कोमोरिन क्षेत्र, दक्षिण आणि पूर्व मध्य बंगालचा उपसागर तसेच उपसागरचा पूर्वेकडील निवडक भाग या दिशेने सरकताना दिसेल; असेही हवामान विभागाने सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: