मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. यामध्ये गेली ७५ वर्षे मुंबईच्या विकासात हातभार लावणाऱ्या बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.एकीकडे बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशन अमृत महोत्सव वर्ष साजरे करत असताना, भारत देशही अमृत महोत्सव वर्ष साजरे करत आहे. यानिमित्ताने देशाला महासत्ता बनविण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदीनी केला असून, त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरविण्यामध्ये येणाऱ्या काळात बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशन महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा ‘मित्र’संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कॉफीटेबल बुकचे राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस राजेश क्षीरसागर यांची महाराष्ट्र राज्याच्या ‘मित्र’ संस्थेच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल बॉम्बे इंडस्ट्रीज असोसियेशनच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी गेल्या वर्षभराच्या कारकिर्दीत स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष श्री.नेव्हिल संघवी यांच्या कामाची स्तुती करत नूतन अध्यक्ष श्री.आशिष गांधी यांना पुढील वाटचालीस श्री.राजेश क्षीरसागर यांनी शुभेच्छा दिल्या.
यानंतर बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा ‘मित्र’ संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त सर्व सभासदांना शुभेच्छा दिल्या. संपूर्ण पश्चिम भारतातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रातील सुमारे १३०० पेक्षा अधिक सभासद असणारी आणि अमृत महोत्सव वर्ष साजरा करणारी अग्रगण्य संघटना असून, गेल्या अनेक वर्षा पासून रोजगार निर्मिती, आयात -निर्यात, अत्याधुनिक उत्पादने याद्वारे राज्यासह देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचे काम असोसिएशनने केले आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.