जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराने आता वेग धरला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि महाविकास आघाडी पुन्हा एकदा समोरासमोर आली आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसेही पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे. मात्र एकनाथ खडसेंनी आता प्रचारात न उतरता आराम करावा. आता त्यांचे वय झाल्याची अशी टीका भाजपा नेते गिरीश महाजनांनी केली होती.
गिरीश महाजनांच्या टीकेला एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिले आहे. खडसे म्हणाले, गिरीश महाजन यांना आता माझी भीती वाटू लागली आहे. म्हणून ते मला प्रचार थांबवा, असे म्हणत आहेत. मी मरेपर्यंत राजकारणी राहणार आहे आणि मरेपर्यंत मी राजकारणात सक्रिय असणार आहे. जोपर्यंत माझा आवाज बुलंद आहे, तोपर्यंत मी थकणारा नाही. मी जनतेचे प्रश्न घेऊन सातत्याने संघर्ष केला आहे, मी लढणार आहे.
मी कुणाचे पाय धरून, बोट धरून किंवा पाय चाटून मोठा झालेला माणूस नाही. कुणाच्या मागे उभे राहून टिव्हीवर माझा चेहरा दिसला पाहिजे, असे मी कधीही केले नाही. मी कुणाच्या मागे उभा राहिलो नाही. लोक माझ्या मागे उभे राहिले आणि ते टिव्हीवर झळकले. त्यांची लाचारी असते. मी लाचार नाही. मी विश्वासाने जगणारा माणूस आहे. त्यामुळे मी लढत राहणार, असे एकनाथ खडसेंनी ठणकावून सांगितले. आहे.