आगामी निवडणुकीआधी महाविकास आघाडीत फाटाफूट होऊ शकते तसेच त्यांच्या वज्रमूठीला भेगा पडल्या आहेत. २०२४च्या निवडणुकीत भाजपच विजयी होईल. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ जागांवर भाजपा आणि शिंदे गट विजयी होईल, असा दावा कालपर्यंत भाजप नेत्यांकडून केला जात होता. मात्र, या दाव्याला भाजपचे नेतेच चंद्रकांत पाटील यांनी छेद दिला आहे. त्यांनी २०२४ची लोकसभा निवडणूक ही आधीच्या दोन्ही लोकसभा निवडणूक इतकी सोपी नसल्याचा दावा केला आहे. तसेच महाविकास आघाडीचे ऐक्य तुटणार नाही, असे भाकीतही चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या रोखठोक विधानाने भाजप नेत्यांची चिंता वाढली आहे.
शिरुर तालुक्यात भाजप बुथ प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला चंद्रकांत पाटील यांनी संबोधित केले. त्यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या देत पुढील निवडणूक किती अवघड आहे हे स्पष्ट केले. २०१४ आणि २०१९च्या निवडणुका बघता पुढील निवडणूक आवळ्याची सोप्पी जाणार नाही. २०१९मध्ये आपल्यासोबत असलेले अघोषित होते. तेच आता २०२४मध्ये घोषित म्हणून निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे आपल्या आपल्या प्रभागातील प्रश्न सोडवावे लागणार आहेत. प्रभागात लक्ष द्यावे लागणार आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
२००९ला गिरीश बापटांना कसब्यात ५३ हजार मते मिळाली होती. त्यावेळी दोन विरोधी उमेदवारांना ८६ हजार मते मिळाली. आता मात्र दोन उमेदवार थेट भिडले. उरलेल्या उमेदवारांना नोटासहीत १० हजार मते पडली. त्यामुळे हे भाजप फेमिकॉल आहे (भाजप हे फेमिकॉल सारखा ब्रँड आहे त्यामुळे विरोधक एकत्र येत आहेत) भाजपला पराभूत करता येत नसल्याने ते एकत्र येत आहेत. बापट यांच्यापेक्षा अधिक मते मिळून आपला उमेदवार पराभूत झाला. कारण थेट लढत झाली. त्यांच्यात बंडखोरी झाली नाही. कारण, त्यांच्यात फेविकॉल होता. त्यांची इथून पुढे युती तुटेल हे गृहीत धरू नका, असे पाटील म्हणाले.