लिंबू-मिरची, टाचण्या, काळ्या बाहुल्या, रेडा बळी ही काही महाराष्ट्र राज्याची ओळख असता कामा नये. तशी ती होताना दिसत आहे. मागे एकदा मुख्यमंत्री महोदय हे नागपुरातील रेशीम बागेतील संघ मुख्यालयात गेले.त्यावेळी लोकांनी त्यांची गंमत केली. सरसंघचालकांनी सावधानता बाळगावी. मुख्यमंत्री येऊन गेलेत. संघ मुख्यालयातील कोपऱ्यात सुया, टाचण्या, लिंबू वगैरे पडले आहेत का तपासा! असा सध्या चेष्टेचा विषय झाला आहे खरा, असे सांगत हाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे खोके सरकार आल्यापासून अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसत आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात राजकीय विरोधकांचे जे अपघात होत आहेत यामुळे त्या अघोरी विषयांच्या चर्चांना हवा मिळाली आहे. विरोधकांच्या जीवितांचे रक्षण व्हावे यासाठी निदान उपमुख्यमंत्र्यांनी पांडुरंगास साकडे घालावे, अशी मागणी करत, महाराष्ट्राने अंधश्रद्धेविरुद्ध नेहमीच लढा दिला. जादूटोणा वगैरे अंधश्रद्धेस मूठमाती देण्यासाठी सरकारने कायदा केला, पण महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे खोके सरकार आल्यापासून जादूटोणा, करणी, टाचण्या, लिंबू-मिरची वगैरे अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसत आहे व सध्या याच विषयांची चर्चा मंत्रालयात व इतर सरकारी कार्यालयांत होत असते, असे शिवसेनेने सामना अग्रलेखात म्हटले आहे.
महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. या राज्यात जादूटोणा, सरकारी बंगल्यावरील मिरची यज्ञ वगैरे अघोरी प्रथांना स्थान नाही, पण शिंद्यांचे जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले आहे, असा मोठा दावा शिवसेनेने केला आहे. याचा संबंध लोक सरकारपुरस्कृत जादूटोण्याशी जोडत असतील तर ते बरे नाही. काल पुणे शहरातील एका कार्यक्रमादरम्यान दीपप्रज्वलनाच्या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला. उपस्थितांच्या लक्षात हा प्रकार आल्याने मोठा अनर्थ टळला. त्याचदरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे एका विचित्र लिफ्ट अपघातातून बालबाल बचावले, असे दाखले शिवसेनेने सामना अग्रलेखात दिले आहेत.