मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा निषेध म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.त्यावरून दोन दिवसांपासून भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगला होता. त्यात सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादीने यावर प्रतिक्रिया दिली होती. नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन चुकीचे असल्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याने दिवसा अखेरीस राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस अशी टोलेबाजी सुरू झाली.
कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा राजकीय नेत्यांनी इतर नेत्यांच्या अथवा पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणे चुकीचे आहे. अशाप्रकारे आंदोलने करणे योग्य नाही. नेत्यांची घरे किंवा कार्यालयांबाहेर आंदोलनाचे अलीकडे सुरू झालेले प्रकार चुकीचे आहेत, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. अशा प्रकारच्या आंदोलनांमुळे पोलीस प्रशासनावर विनाकारण ताण येतो, असे राष्ट्रवादी काँग्रेस मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. यावर आता काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ज्या पद्धतीने अर्वाच्य भाषा भाजप नेत्यांनी वापरली, मारहाणीची धमकी दिली त्याबद्दल नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली असती तर जास्त सयुक्तिक झाले असते. पंतप्रधान मोदींचे वक्तव्य आणि त्यावर भाजप नेत्यांचे मौन याचा निषेध करण्यासाठी आम्ही गेलो होतो. मुळात नेत्यांची घरे किंवा पक्ष कार्यालयावर आंदोलने नेण्याची प्रथा भाजपने सुरू केली आहे असा टोला त्यांनी लगावला होता.