चर्चा तर नक्की होणार..! ‘सातारा पॅटर्न’ अमेरिकेतही यशस्वी, पावसात भिजलेल्या जो बायडेन आणि पवारांचे फोटो होतायत तुफान व्हयरल

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी बाजी मारली आहे. बायडेन यांनी बहुमताचा आकडा पार केला असून ते 46 वे राष्ट्राध्यक्ष होणार हे आता पक्के झाले आहे. बायडेन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहचला असतानाच फ्लोरिडा येथे महाराष्ट्रातील सातारा पॅटर्न पाहायला मिळाला होता. गेल्या वर्षी सातारा येथे भरपावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा प्रचंड गाजली होती. फ्लोरिडात डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांचीही पावसात सभा झाली होती. त्यामुळे त्यांच्या विजयानंतर सोशल मीडियावर बिडेन यांचा पावसात भिजलेल्या सभेचा फोटो व्हायरल झाला असून ‘सातारा पॅटर्न’ अमेरिकेतही यशस्वी झाल्याची चर्चा जोमात सुरू आहे.

दरम्यान, डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पावसात झालेल्या प्रचार सभेचा फोटो शेअर केला होता. ‘वारा-वादळे येतील आणि जातील पण नवा दिवस येईल’ अशी कॅप्शन बायडेन यांनी फोटोला दिली होती.

अमेरिकन नागरिकांची मने जिंकली

फ्लोरिडात जो बिडेन यांचे भाषण सुरू असताना अचानक पाऊस आणि जोराचा वारा सुरू झाला. सभेला आलेले लोक आपल्या कारमध्ये बसले आणि तेथूनच बायडेन यांचे भाषण ऐकले. बायडेन यांनी मात्र भरपावसात भाषण केले.

… आणि 18 ऑक्टोबर 2019 ची शरद पवार यांची सभा

बायडेन यांच्या पावसातील सभेने गेल्या वर्षीची सातारा येथील सभेची आठवण अवघ्या महाराष्ट्राला आणि देशाला झाली. विधानसभेबरोबरच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 18 ऑक्टोबर 2019 रोजी सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा होती. शरद पवार भाषणाला उभे राहताच जोरदार पाऊस आला. पावसाची तमा न बाळगता झालेले पवारांचे भाषण प्रचंड गाजले. या सभेने सातारा आणि महाराष्ट्रात परिवर्तन घडले.

अमेरिकेत मतमोजणी सुरू असताना आणि प्रचार सुरू असताना राज्यात बायडन आणि शरद पवार यांचे एकत्रित फोटो तुफान व्हयरल होत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: