कोविडचा संसर्ग थोपविण्यासाठी नव्या उत्साहाने पूर्णपणे सज्ज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्वाही

गेल्या वर्षीप्रमाणे आता देखील संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पाऊले उचलण्यात येतील असा विश्वास देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी जेणे करून लसीकरणाचा वेग वाढवता येईल तसेच हाफकिनला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळावी अशी विनंती केली.

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांची सूचना लगेचच उचलून धरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात सर्व राज्यांमध्ये लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ व प्रोत्साहन देण्यात येईल असे जाहीर केले.
आज दुपारी देशातील काही राज्यातील वाढत्या कोविड संसर्गाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की , लसीकरणासाठी ज्या केंद्रांची तयारी व क्षमता आहे अशा केंद्रांना किंवा रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी मिळावी. लसीकरणासाठी महाराष्ट्रात देखील अनेक खासगी रुग्णालयांनी नोंदणी केली आहे पण त्यापैकी किती जणांची प्रत्यक्ष तयारी आहे हे तपासून लसीकरण वाढविण्यात येईल. दररोज ३ लाखांपर्यंत लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येईल.

कोविड लसीचे हाफकिनकडून उत्पादन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विनंती केली. हाफकिन बायो फार्मासिटीकल कॉर्पोरेशन लिमिटेड यांना मिशन कोवीड सुरक्षेअंतर्गत लसीची टेक्नॉलॉजी हस्तांतरण करण्या साठी आयसीएमआरच्या मार्गदर्शनाने परवानगी मिळावी जेणे करून लस प्रत्यक्ष उत्पादित करता येईल किंवा फील- फिनिश ( Fill & Finish) बेसिसवर हाफकीनला काम करता येईल, यामधून १२६ दशलक्ष कोविड लसी हाफकिनमार्फत उत्पादित होऊ शकतात असे मुख्यमंत्री म्हणाले. यावर पंतप्रधानांनी देशात सर्वच राज्यांत अशा प्रकारे लस उत्पादनात पुढाकार घेणाऱ्या उद्योग व संस्थांना प्रोत्साहन देण्याचे आणि त्यांची क्षमता २४ X ७ पूर्णपणे कशी वापरता येईल ते पाहण्याचे बैठकीत जाहीर केले.

Team Global News Marathi: