कोरोनाने घेतला तरूण IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचा बळी

त्रिपुरा येथील वित्त विभागाचे सहसिचव, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य, सचिव व कोषागार संचालक पदाचा अतिरिक्त पदभार असलेले व मुळचे महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यातील असलेले सुधाकर शिंदे यांचे आज कोरोनामुळे पुण्याच्या खासगी रुग्णालयात निधन झाले. अवघ्या पस्तीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दोन आठवड्यापुर्वी शिंदे पत्नी व मुलीसह 14 दिवसांची सुट्टी घेऊन आपल्या गावी आले होते.

गावातच त्यांना कोरोनाची बाधा झाली. कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर त्यांच्यावर सर्वप्रथम नांदेडच्या गुरूगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृती सुधारत असतानाच त्यांना संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. पण त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि त्यांना संभाजीनगरहून पुण्याच्या रुबी हॉस्पीटल हलवण्यात आले. मात्र आज उपचारा दरम्यान शिंदे यांचे निधन झाले.

त्रिपुरा केडरच्या 2015 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले सुधाकर शिंदे हे मुळचे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्याच्या उमरा येथील रहिवाशी होते. त्रिपुरा येथे ते वित्त विभागाचे सहसचिव म्हणून कार्यरत होते. त्यासोबत त्यांच्याकडे आरोग्य व कुटुंब कल्याण, कोषागार विभागाचा देखील पदभार होता. आपल्या गावी येण्यासाठी शिंदे यांनी 18 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2020 अशी चौदा दिवसांची रजा घेतली होती.

ग्लोबल न्युज नेटवर्क: