स्थानिक महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. एकीकडे शिवसेनेला खिंडार पडलेले असताना आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडयांच्या बालेकिल्ल्यात मोठे भगदाड पडणार आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे तब्बल 22 नगरसेवक पक्षाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये आता राजकीय घडामोडी सुरु झाल्या आहेत. शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे लक्ष केंद्रित केले आहे. तब्बल २२ नगरसेवक राष्ट्रावादी पक्षाची साथ सोडणार अशी माहिती समोर आली आहे. हा गट वेगळा गट स्थापन करणार अथवा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या २२ पैकी ६ नगरसेवक लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे. हे पक्षांतर म्हणजे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मोठी खेळी मानली जात आहे. मुंब्रा आणि कळवा येथील अनेक नगरसेवकांसह शेकडो राष्ट्रवादीचे पदाधिकारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करतील. ठाणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेना पक्ष इतर पक्षांना खिंडार पाडण्याचे काम करत आहेत.