छत्तीसगडमध्ये जवान-नक्षलवादी चकमक, २२ हुतात्मा

नवी दिल्ली: छत्तीसगडमधील सुकमामध्ये सुरक्षा पथकाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत २२ जवानांनी बलिदान दिले. अद्याप एक जवान बेपत्ता आहे. जखमी झालेल्या ३२ जवानांना बिजापूर आणि रायपूर येथील सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल केले. बेपत्ता जवानाचा शोध सुरू आहे. जंगलात एम आय १७ हेलिकटप्टरच्या मदतीने शोध मोहीम राबवली जात आहे. (Chhattisgarh Maoist attack: 22 jawans killed, 32 injured & 1 missing)

चकमकीची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व माहिती घेतली तसेच सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांना सलाम केला. जवानांचे बलिदान वाया जाऊ दिले जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. राष्ट्रपती, संरक्षणमंत्री यांनीही छत्तीसगडमधील घटनेची माहिती मिळताच बलिदान देणाऱ्या वीरांना सलामी दिली.

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा बटालियन, डीआरजी आणि एसटीएफची संयुक्त टीम नक्षलविरोधी कारवाईसाठी शुक्रवारी रात्री रवाना करण्यात आली होती. विजापूर जिल्ह्यातील तर्रेम, उसूर व पामेड आणि सुकमा जिल्ह्यातील मिनापा व नरसपुरम येथील कारवाईत सुमारे दोन हजार सैनिक सहभागी झाले होते, असं राज्यातील नक्षलविरोधी कारवाईचे पोलीस उपमहानिरीक्षक ओ.पी. पाल यांनी शुक्रवारी रात्री सांगितलं होतं. दरम्यान, शनिवारी नक्षलवाद्यांसोबत झालेली चकमत तब्बल तीन तासांपेक्षा अधिक वेळ सुरू होती अशी माहितीही पोलीस अधिकाऱ्यानं दिलं. यापूर्वी २३ मार्च रोजी नक्षलवाद्यांनी नारायणपूर जिल्ह्यात स्फोट करून बस उडवली होती. यात बसमध्ये असलेले डीआरजीचे पाच जवान शहीद झाले होते.

जंगलात बंदी घातलेल्या सीपीआय माओवादी गटाचे नक्षलवादी एकवटले होते. यात मडवी हिडमा नावाचा एक मोस्ट वाँटेड नक्षलवादीही सहभागी होता. हा नक्षलवादी २०१३ पासून प्रचंड सक्रीय आहे. तो नक्षलवाद्यांच्या एका बटालियनचे नेतृत्व करतो. अनेक मोठ्या हिंसक कारवायांमध्ये त्याचा आणि त्याच्या बटालियनचा हात आहे. त्याच्या बटालियनकडे आधुनिक शस्त्रास्त्रे आणि नेटवर्क जॅमर आहेत. याच कारणामुळे त्याला पकडण्याच्या हेतूने सुरक्षा पथकाने प्रयत्न केला; अशी माहिती पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पट्टलिंगम यांनी दिली.

नक्षलवाद्यांविरोधात सीआरपीएफ (Central Reserve Police Force – CRPF), कोब्रा (Commando Battalion for Resolute Action – CoBRA), डीआरजी (District Reserve Guard – DRG) आणि एसटीएफ (Special Task Force) या पथकांनी संयुक्त कारवाई केली. पण घनदाट जंगल, लपून पहारा देणाऱ्या आणि बैठकीसाठी उपस्थित असलेल्या नक्षलवाद्यांविषयीची मर्यादीत माहिती यामुळे सशस्त्र कारवाईत सुरक्षा पथकांना प्राणांची आहुती द्यावी लागली.

अमित शहा प्रचार दौरा सोडून दिल्लीत परतणार

छत्तीसगडमध्ये झालेला नक्षलवादी हल्ला आणि  उत्तराखंडच्या जंगलात पेटलेला वणवा या दोन घटनांची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने प्रचार सोडून दिल्लीत परतत आहेत. ते राजधानीत काही महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत. अमित शहा छत्तीसगड आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: