भारताचं हित जपणं अमेरिकेसाठी महत्त्वाचं – उपाध्यक्ष कमला हॅरिस

देशभरात आज कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा वाढलेली दिसून येत आहे. त्यात अनेक देशांनी भारताच्या या संकटात सढळ हाताने मदत केली आहे. करोनाच्या मोठ्या आपत्तीशी झुंजणाऱ्या भारताला अमेरिकेतर्फे आवश्यक ती सर्व मदत दिली जात असून या अवघड काळात भारताचे हित जपणे ही अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे, असे अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी म्हटले आहे.

त्या म्हणाल्या की, या पार्श्वभूमीवर संपूर्ण बायडेन प्रशासन त्यासाठी मदत करण्यास पुढे आले आहे. अमेरिकेत भारतासाठी निधी संकलन करण्याचे काम सध्या विविध पातळ्यांवर सुरू आहे.त्याच्या संबंधातील एका कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, जेव्हा आमची रुग्णालये कोविड पेशंटनी भरली होती त्यावेळी भारताने आम्हाला मदत पाठवली होती. आता भारताला मदत करणे ही आमची जबाबदारी आहे.

भारताचे मित्र म्हणून आम्ही हे काम करीत आहोत. आपण जगातल्या सर्वांनीच एकत्रितपणे भारताला मदत केली तर आपण यातून निश्चित बाहेर पडू शकू, असा मला विश्वास आहे. बायडेन प्रशासनाने भारताला दहा कोटी अमेरिकन डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेने आतापर्यंत सहा मोठी मालवाहू विमाने भारतात पाठवून भारतला वैद्यकीय मदत पोहचवली आहे. अमेरिकेचे व्हाईट हाऊस आणि विदेश मंत्रालय अमेरिकेतील कार्पोरेट कंपन्यांशी संपर्क प्रस्थापित करून भारतासाठी मदत संकलित करीत आहे, असेही हॅरिस यांनी सांगितले.

Team Global News Marathi: