भारताचा इंग्लंडवर 7 विकेटने विजय ; इशान किशन पदार्पणातच ठरला सामनावीर

सलामीच्या लढतीत दारुण पराभव झालेल्या ‘टीम इंडिया’ने दुसऱया टी-20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा 7 गडी आणि 13 चेंडू राखून धुव्वा उडवला. पदार्पणवीर इशान किशनचे वादळी अर्धशतक आणि कर्णधार विराट कोहलीची मॅचविनिंग खेळी ही हिंदुस्थानच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. किशनने पदार्पणाच्या लढतीत ‘सामनावीरा’चा बहुमान मिळविला हे विशेष. हिंदुस्थानने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. धडाकेबाज खेळी साकारताना कर्णधार विराटने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत 12 हजार धावा करणारा कर्णधार म्हणून आपले नाव नोंदवले आहे.

इंग्लंडकडून मिळालेले 165 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने 17.5 षटकांत षटकांत 3 बाद 166 धावा करून पूर्ण केले. पहिल्या लढतीत एका धावेवर बाद झालेल्या लोकेश राहुलला दुसऱया लढतीत भोपळाही फोडता आला नाही.

 

सॅक कुरणने त्याला यष्टीमागे बटलरकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला पहिल्याच षटकात हादरा दिला. दुसरा सलामीवीर इशान किशन व आलेला विराट कोहली यांनी दुसऱया विकेटसाठी 94 धावांची भागीदारी करीत हिंदुस्थानच्या डावाला आकार दिला. पदार्पणाच्या टी-20 सामन्यात अर्धशतक ठोकणारा किशन हा दुसरा हिंदुस्थानी फलंदाज ठरला.

 

कसोटी, एकदिवसीय व टी-20 या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत 12 हजार धावा करणारा विराट कोहली हा पहिला कर्णधार ठरला. कुठल्याही संघाच्या कर्णधाराला आतापर्यंत तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये 12 हजार धावांचा टप्पा गाठता आलेला नाही.

 

कर्णधार या नात्याने सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीतही कोहली तिसऱया क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंग 15,440 धावांसह अव्वल स्थानावर आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: