विरार | विरारमध्ये शनिवारी हत्येची एक थरारक घटना उघडकीस आली आहे. येथील एका ३५ वर्षीय तरुणावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केला आहे. सदर तरुणाला चार गोळ्या लागल्या होत्या. यावेळी आसपासच्या लोकांनी तातडीने तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण याठिकाणी उपचार सुरू असताना संबंधित तरुणाची प्राणज्योत मालवली आहे. विरारमध्ये भरदिवसा हा खुनी थरार घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे.
हत्येची ही घटना उघडकीस येताच विरार पोलिसांनी शिवसेना नेत्यासह ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास केला जात आहे. समय चौहान असं हत्या झालेल्या ३५ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो एक व्यापारी असून फर्निचर आणि बाजार भरवण्याचं काम करत होता. घटनेच्या दिवशी शनिवारी दुपारी तो मनवेल पाडा येथून आपल्या घराकडे निघाला होता. घराच्या दिशेनं जात असताना, याठिकाणी आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला.
या हल्ल्यात मृत समयला चार गोळ्या लागल्या आणि तो घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. यावेळी आसपासच्या लोकांनी समयला तातडीने अलायन्स या खाजगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. गोळ्या लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. हत्येची माहिती मिळताच विरार पोलिसांनी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एका शिवसेना नेत्याचा देखील समावेश आहे.