छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कराल तर याद राखा कर्नाटकात येवून मस्ती जिरवू

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कराल तर याद राखा कर्नाटकात येवून मस्ती जिरवू

कन्नड रक्षक गुंडाकडून सिमावासियांवर अन्याय होत होते. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनीही सीमा बांधवांवर अन्याय केले. आता मात्र कर्नाटक सरकारने हद्द पार केली असून, महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा पुतळा एका रात्रीत काढला गेला. हा पुतळा पुन्हा सन्मानाने आहे त्या जागी विराजमान करा, अन्यथा कर्नाटकात येवून मस्ती जिरवू, असा सज्जड इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.

सीमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हटविला. या घटनेचा निषेध करीत आज छत्रपती शिवाजी महाराज चौक कोल्हापूर येथे शिवसेनेच्या वतीने कर्नाटकी सरकारच्या प्रतिमेचे दहन केले. याठिकाणी “जय भवानी जय शिवाजी”, “कर्नाटक सरकारचा धिक्कार असो” “कर्नाटक शासनाची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही” अशा निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, कर्नाटक सरकार कडून गेली कित्तेक वर्षे सीमाभागातील मराठी माणसांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जातो. कर्नाटक सरकारमध्ये मराठी द्वेष एवढा आहे की मराठी बांधवांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे आहे. त्यास तेथील कानडी गुंडाची साथही आहे.

गेल्या काही वर्षापूर्वी कानडी गुंडांनी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला पण त्या कानडी गुंडांना कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी योग्य धडा शिकविला आहे. परंतु आजही कर्नाटक प्रशासन महाराष्ट्रच काय अखंड हिंदुस्थानचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान करत असले तर त्यांनी याद राखाव कोल्हापुरात एकाही कानडी माणसाला राहू देणार नाही. यांची नोंद कर्नाटक सरकारने घ्यावी. केंद्रात आणि कर्नाटकात भाजपचे सरकार आहे.

भाजपच जिथे सरकार आहे तिथे छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचे कृत्य होत आहेत. ही गोष्ट वेळीच भाजप सरकारने रोखावी अन्यथा कोल्हापुरातील शिवसैनिक शांत बसणार नाही, त्यांची शिवसेनेशी गाठ असेल, याची दखल घ्यावी. घडलेली घटना शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना कळविली असून, पक्षप्रमुखांचा आदेश आल्यास कर्नाटकात घुसून कर्नाटक सरकारचा माज उतरवू, असा इशारा दिला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: