बंगळुरू | कर्नाटकात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. त्यात भाजपा शासित कर्नाटक सरकारमध्ये मुख्यमंत्री पदासाठी नवा चेहरा देण्यात येणार असल्याची चर्चा रंगताना दिसून येत होती. पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या जागी नवा चेहरा देणार असल्याची चर्चा कर्नाटक भाजपमध्ये सुरु असल्याचं कळतं. मात्र मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी नेतृत्वबदलाच्या चर्चा सपशेल नाकारत राज्यात पर्यायी चेहराच नसल्याचं काही दिवसांपूर्वी म्हंटल होत.
अशातच आज बेककिना कलमात्तो मठाचे मल्लिकार्जुन मुरुगराजेंद्र स्वामी यांनी राज्यातील नेतृत्वबदलाच्या चर्चांना थेट विरोध करत आपला पाठिंबा मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी, जर येडियुरप्पा यांना हटवण्यात आले तर ते राज्यासाठी करोना पेक्षाही अधिक धोकादायक ठरेल असा दावा देखील त्यांनी केला. आता त्यांच्या या दाव्याची संपूर्ण कर्णताकात चर्चा सुरु झालेली आहे.
‘राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा करोना विषाणू महासाथीचा समर्थपणे सामना करत आहेत. राज्यातील बाधितांची संख्या कमी व्हावी यासाठी ते शर्थीचे प्रयत्न करतायेत. राज्यातील जनतेनेही त्यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. दशकांच्या कठोर मेहनतीनंतर व रस्त्यावरील संघर्षानंतर त्यांनी हे पद प्राप्त केले आहे. भाजप नेतृत्वाने येडियुरप्पा यांच्या कठोर मेहनतीचा व त्यांच्या लोकांना आपल्यासोबत जोडून घेण्याच्या कौशल्याचा आदर करायला हवा.’ अशी स्पष्ट भूमिका मल्लिकार्जुन मुरुगराजेंद्र स्वामी यांनी मांडली.