आयएएस पूजा सिंघल यांच्या घरावर ईडीची धाड, पैसे मोजून अधीकारी थकले!

 

रांची | झारखंडमधील बेकायदा खाण प्रकरणात वरिष्ठ आयएएस अधिकारी पूजा सिंघल आणि त्यांच्याशी संबंधित असलेली लोकांची घरं आणि कार्यालयं अशा २५ ठिकाणी ईडीच्या पथकाने धाड टाकली. यावेळी कोट्यवधींची रोकड सापडली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा बघून अधिकारी पण चक्रावले. आर्थिक अफरातफर अर्थात मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ईडीने दिल्ली, मुंबई, जयपूर, फरिदाबाद, मुझफ्फरपूर, रांची अशा वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी धाड टाकली.

पूजा सिंघल यांचे दुसरे पती अभिषेक यांच्या मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलसह सहा ठिकाणी तपास करण्यात आला. ईडीने पूजा सिंघल यांच्या सीएच्या ऑफिसमधून मोठी रोख रक्कम जप्त केली. आतापर्यंत सिंघल प्रकरणी ईडीच्या कारवाईत १९ कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जप्त झाली. एक कनिष्ठ अभियंता राम विनोद प्रसाद सिन्हा याला भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आली. या अटकेनंतर अभियंत्याने दिलेल्या माहितीआधारे ईडीने धाड टाकली. धाडीत मोठ्या प्रमाणात संपत्ती जप्त करण्यात आली.

पूजा सिंघल या झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विश्वासू प्रशासकीय अधिकारी आहेत. सोरेन यांनी अनेक महत्त्वाची कामं पूजा सिंघल यांच्याकडे सोपविली आहेत. यामुळे पूजा सिंघल यांच्यावरील धाड हा झारखंडमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. सध्या पूजा सिंघल झारखंड राज्याच्या खनिज विकास निगमच्या व्यवस्थापकीय संचालिका आहे. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या अनेक कामांची चौकशी सुरू आहे. ईडीने कोळसा व्यापार आणि बेकायदा कोळसा उत्खनन प्रकरणात धनबादमध्ये नऊ कंपन्यांवर धाड टाकली आहे.

Team Global News Marathi: