मीच जाणती, बाकी सारे इमॅच्युअर, असा दावा नाही, शौमिका महाडिकांचा पवारांना टोला…!
“मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे इमॅच्युअर असा माझा अजिबात दावा नाही” असे ट्विट करत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा भाजपा महिला नेत्या शौमिका महाडिकांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे. शौमिका महाडिक ह्या माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आहेत.

महाडिक यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष केलेल्या टीकेची आता राज्यभर चर्चा होताना दिसत आहे. पार्थ पवार यांच्या बाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी “पार्थ इमॅच्युअर आहे, त्याच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही” असे वक्तव्य पवार यांनी केले होते.
शौमिका महाडिक यांनी काल दुपारी साडे चारच्या सुमारास एक ट्वीट केले. “आज गोपाळकाला आहे.. महाभारतामध्ये कौटुंबिक वादातून सातत्याने अन्याय सहन करावा लागलेल्या ‘पार्थ’चे युद्धात ज्याने सारथ्य केले.. त्या श्रीकृष्णाचा दिवस..!” असे त्यात म्हटले होते.
कोण आहेत शौमिका महाडिक?
शौमिका महाडिक या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा असून सध्या झेडपी सदस्य आहेत. त्या भाजपच्या कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्षपदी आहेत. शौमिका महाडिक यांचे पती अमल महाडिक हे भाजपचे माजी आमदार असून दीर माजी खासदार धनंजय महाडिक हे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. शौमिका महाडिक या माजी आमदार महादेव महाडिक यांच्या स्नुषा.
शरद पवार काय म्हणाले होते?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही”
पार्थ पवार यांची प्रतिक्रिया
“शरद पवार यांच्या बोलण्यावर सध्या मला काहीही बोलायचं नाही”, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली होती.