राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीमध्ये मंत्री राहिलेले हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली आहे. पहाटे सकाळी 6 वाजल्यापासून ईडीकडून छापेमारी सुरु करण्यात आली आहे. छापेमारी होत असल्याची मुश्रीफ यांनी माध्यमांकडे पुष्टी केली आहे. लवकरच सर्व माहिती घेऊन बोलणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
हसन मुश्रीफ यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोपांची मालिका सुरू केली होती. सातत्याने त्यांच्यावर ईडीची छापे पडणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते. सोमय्या यांनी कारखाना कार्यस्थळावर भेट दिली होती. दरम्यान, प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर छापे पडल्याचे समजते. आज सकाळपासून कोल्हापूर आणि पुण्यामध्ये छापेमारी सुरू केली आहे.
दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार आपासाहेब नलवडे कारखान्यामधील झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून हे प्रकरण आहे. हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणावरून आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर आपला काही संबंध नाही असं म्हटलं होतं.माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाचवेळी सकाळपासून छापेमारी करण्यात आली आहे. घराला परिसरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.