नवी दिल्ली | कोरोनाला रोखण्यासाठी देशात युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली असून दोनच दिवसांपूर्वी देशाने करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ऐतिहासिक टप्पा पार पाडला आहे. तब्बल १०० कोटींचा मोठा टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातल्या लस उत्पादकांशी चर्चा केली.
मोदी यांच्या चर्चेनंतर सीरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. पूनावाला म्हणाले की, भारताने १ अब्ज लसीकरणाचा टप्पा गाठला तो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळेच, ‘पंतप्रधानांनी प्रवाहाविरुद्ध जाऊन सगळ्यांना वेगाने हालचाल करायला लावली. ते नसते आणि फक्त आरोग्य मंत्रालयाकडे नियंत्रण असतं तर आज भारत एक अब्ज डोस तयार करू शकला नसता.’ असे पुनावाला यांनी एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे ते म्हणाले की, ‘माझ्या मनात त्याबद्दल कोणतीही शंका नाही. नोव्हेंबरमध्ये जेव्हा ते पुण्यात आले तेव्हा मी त्यांना आश्वासन दिले होते आणि आज भारताला कोविड लसींबद्दल स्वयंपूर्ण बनवण्याचे आमचे आश्वासन पूर्ण झाल्याबद्दल त्यांना आनंद झाला. जगातील सर्वात कमी संभाव्य किमतीत भारतात लस उपलब्ध आहे. पंतप्रधान नियामक परवानग्या मिळविण्यासाठी प्रवाहाविरुद्ध गेले आणि आज भारत एवढ्या मोठ्या लोकसंख्येला लसीकृत करू शकला आहे’, सायरस पूनावाला पुढे म्हणाले.