ग्राहकांना मोदी सरकारच्या मोठा झटका, 250 रुपयांनी वाढले गॅसचे दर

 

नवी दिल्ली | सरकारी तेल कंपन्यांनी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. 1 एप्रिलपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 250 रुपयांची मोठी वाढ केली आहे. तेल कंपन्यांनी कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये ही वाढ केली आहे. तर घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना ही दरवाढ सहन नाही करावी लागणार आहे. तेल कंपन्यांनी 10 दिवसांपूर्वी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ केली होती, त्यावेळी या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत कमी झाली होती. आता व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे.

नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असताना कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीत 250 रुपयांची वाढ झाल्याने मुंबईमध्ये 19 किलोग्रॅमसाठीचा हा दर आता 2,205 रुपयांवर पोहोचला आहे, याआधी दर 1,955 रुपये होता. दिल्लीमध्ये कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत 2,253 रुपयांवर पोहोचली आहे. 1 मार्च रोजी याठिकाणी दर 2,012 रुपये होता, 22 मार्च रोजी जेव्हा या दरात घसरण झाली होती त्यावेळी किंमत 2,003 रुपयांवर पोहोचली होती.

आज दरम्यान जरी कमर्शिअल गॅसच्या किंमती वाढल्या असल्या तरी घरगुती गॅसच्या किंमती बदलल्या नाही आहेत. तसंच आज पेट्रोल-डिझेलच्या किमतीतही वाढ झालेली नाही. त्यामुळे सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पण कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्याने हॉटेल-रेस्टॉरंटमधील खाणं महाग होऊ शकतं.

Team Global News Marathi: