Friday, July 1, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दक्षिणेतील गंगा म्हणून ओळख असणारी गोदावरी नदी – उगम ते समुद्रभेट.. वाचा सविस्तर-

by ग्लोबल न्युज नेटवर्क
June 17, 2022
in महाराष्ट्र
0
दक्षिणेतील गंगा म्हणून ओळख असणारी गोदावरी नदी –  उगम ते समुद्रभेट.. वाचा सविस्तर-
ADVERTISEMENT

दक्षिणेतील गंगा म्हणून ओळख असणारी गोदावरी नदी – उगम ते समुद्रभेट.. वाचा सविस्तर-

दक्षिणेतील गंगा म्हणून ओळख असणारी व धार्मिक दृष्ट्या खूप महत्वाची असलेली गोदावरी नदी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते. त्र्यंबकेश्वर ते बंगालच्या उपसागराला मिळेपर्यंत १४६५ किमी इतका लांब प्रवास करणाऱ्या गोदावरीचे सुरुवातीला १०-१५ मीटर्स रुंदीचे पात्र राजमहेंद्रीला साडेचार किमी एवढे विस्तीर्ण आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्रप्रदेश या तीन राज्यातून प्रवास करत असली तरीही तिच्या खोऱ्यात महाराष्ट्र(४८.६%), तेलंगणा व आंध्रप्रदेश(२३.४%), मध्यप्रदेश व छत्तीसगढ(२०.७), ओडिशा(५.५%) व कर्नाटक(१.४%) राज्यांचा समावेश होतो. तिच्या एकूण खोऱ्याचे क्षेत्रफळ ३,१२,८१२ चौ.किमी.आहे. गोदाकाठच्या प्रदेशाला नदीमुळे वेगळी संस्कृती लाभली आहे. अनेक धार्मिक केंद्रे, धरणे, सिंचन योजना, वीजप्रकल्प आणि त्यातून विकसित झालेली राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक स्थित्यंतरं निर्माण झाली आहे. चला तर मग गोदावरीच्या उगम ते समुद्रभेटीपर्यंतच्या शब्दरूपी परिक्रमेला.

ADVERTISEMENT

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या बारा ज्योतर्लिंगांपैकी एक असलेल्या तीर्थक्षेत्राच्या जवळच असलेल्या ब्रम्हगिरी पर्वतात गोदावरी नदीचा उगम होतो. गौतम ऋषींनी गोहत्येच्या पापमुक्तीसाठी तृणबांध घालून अडवलेली गौतमी म्हणजेच भगवान शंकराच्या जटेतून प्रकटलेली गंगा म्हणजेच गोदावरी, अशी पौराणिक-धार्मिक आख्यायिका सांगितली जाते. त्र्यंबकेश्वर येथील आद्य ज्योतिर्लिंग मंदिर प्राचीनकालीन असल्याचे म्हटले जाते. यादव राजवटीत त्याचा पहिला जीर्णोद्धार झाला. सद्याचे जे मंदिर आहे, त्याचे बांधकाम नानासाहेब पेशव्याच्या काळात सुरु होऊन १७८६ साली पूर्ण झाले. मंदिराजवळून वाहणाऱ्या गोदावरीचा विकास व नागरीकरणाच्या रेट्यामुळे दुर्दैवाने उगमस्थळीच गळा घोटण्यात आला आहे.गोदावरी नदी त्र्यंबकेश्वरमध्ये चक्क अंडरग्राऊंड करण्यात आली.

ADVERTISEMENT

त्र्यंबकपासून नाशिकपर्यंत नदीचा प्रवास अरुंद व खडकाळ मार्गाने होतो. त्या वाटेवर गोदावरीवर गंगापूर धरण व सोमेश्वर धबधबा लागतो. समुद्रमंथनातून निघालेल्या अमृतकलाशातील अमृतबिंदू पाच ठिकाणी पडले. त्याच पाच ठिकाणांपैकी एक म्हणजे नाशिक. त्यामुळे नाशिक गोदाकाठावर दर १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो.

मात्र इ.स. १७६२ साली नाशिकला झालेल्या कुंभमेळ्यात शाहीस्नानाच्या वेळी शैव आणि वैष्णवपंथीय आखाड्यात वर्चस्वावरून संघर्ष झाला होता. त्यात हजारो साधू-भाविकांचे प्राण गेले होते. वाद निकाली काढण्यासाठी अनेक चर्चा, बैठक झाल्या, मात्र तोडगा निघत नव्हता. अखेरीस श्रीमंत माधवराव पेशवे यांनी हस्तक्षेप करून शैवपंथीय त्र्यंबकला कुशावर्त येथे तर वैष्णवपंथीय नाशिकला रामकुंड येथे शाहीस्नान करतील असा निर्णय दिला.


तेव्हापासून आजतागायत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी कुंभमेळा भरतो. मात्र अलाहाबाद, हरिद्वार आणि उज्जैन येथे शैव व वैष्णवपंथीय एकत्रच शाहीस्नान करतात. समुद्रसपाटीपासून ७०० मीटर उंचीवर असलेल्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरी नदीवर सुमारे १०८ कुंड असल्याचे सांगितले जाते. त्यापैकी रामकुंड, कुशावर्त आदी ठिकाणी वर्षभर अनेक धार्मिक विधी सुरू असतात. विकासाच्या नावाखाली नाशिकमध्ये सुद्धा गोदावरीच्या नैसर्गिक प्रवाहाचे कॉंक्रीटीकरण केल्या गेले. अधिकाधिक भाविकांना लाभ व्हावा म्हणून रामकुंडाजवळ गोदावरी नदी सिमेंट काँक्रटने विभागल्या गेली. आज मात्र दुर्दैवाने त्याचा वापर कपडे धुण्यासाठी व इतर कारणांसाठीच होतो.

नाशिकनंतर आग्नेयेकडे वाहत जाणाऱ्या गोदेला २४ किमी अंतरावर उजव्या बाजूने दारणा नदी तर लगेच काही अंतरावर डाव्या बाजूने कादवा नदी येऊन मिळते. तेथून जवळच मध्यमेश्वर धरण व नांदूर-मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य आहे. याठिकाणी वर्षभर हजारो पक्ष्यांचं आवागमन होत असतं. पुढे नाशिक जिल्हा संपवून गोदामाय कोपरगाव येथे अहमदनगर जिल्ह्यत प्रवेश करते. आतापर्यंत पश्चिमवाहिनी असलेली गोदावरी इथेच दक्षिणवाहिनी होते. कोपरगावात गोदातीरावर ऐतिहासिक असे गुरु शुक्राचार्यांचं प्रसिद्ध मंदिर आहे.

अहमदनगर-औरंगाबाद जिल्ह्याची सीमा बनत पुढे गोदावरी औरंगाबाद जिल्ह्यात आणि पर्यायाने मराठवाड्यात प्रवेश करते. महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या देवगड येथून वाहत आलेल्या प्रवरा नदीचा गोदेशी जिथे संगम होतो ते ठिकाण म्हणजे प्रवरासंगम. येथूनच १२ किमी अगोदर जंबूद्वीप हे गोदावरीच्या पात्रातील बेट व त्याजवळ असलेले असंख्य महानुभाव पंथीयांचे मंदिरे पाहायला मिळतात. त्यानंतर गोदावरी नदी सातवाहनांची राजधानी असलेल्या प्रतिष्ठाननगरी म्हणजेच पैठणला येते. तेथे भव्यदिव्य असा जायकवाडी म्हणजेच नाथसागर प्रकल्प बांधण्यात आलाय. जायकवाडी हे राज्यातील सर्वात मोठे धरण असून त्याची क्षमता २,९०९ द.ल.घ.मी. इतकी प्रचंड आहे. प्रकल्पाजवळ वीजनिर्मिती प्रकल्प आणि पक्षी अभयारण्य सुद्धा आहे. पैठण येथे आजही सातवाहन काळातील शिल्पे पाहायला मिळतात. पुढे जालना-बीड जिल्ह्याची सीमा बनलेली गोदामायचा बीड जिल्ह्यात वेगवेगळा अनुभव येतो. पांचाळेश्वर येथे गोदानदीपात्रात महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान आहे.

पावसाळ्याचे काही दिवस वगळता याठिकाणी दर्शनाला जाता येते. खरतरं नदीकिनाऱ्यावरील गावात वाळूउपसा हा पर्यायाने आलाच. मात्र वाळूउपश्याचे गंभीर फटका बसल्याने बीड जिल्ह्यातील गंगामसला या गावाने वाळूउपश्यावर स्वयंस्फूर्तीने बंदी घालून गोदेला नवसंजीवनी दिली. त्यानंतर शनीच्या साडेतीन पीठांपैकी एक असलेल्या राक्षसभुवन येथे गोदातीरावर दुसऱ्या बाजीरावाने निझामाच्या विरोधात आपली पहिली लढाई जिंकली होती, अशी इतिहासात नोंद आहे. याच बीड जिल्ह्यातील मंजरथ येथे सिंदफणा नदीला आपल्या कवेत घेत गोदावरी नदी पुढे परभणी जिल्ह्यात प्रवेश करते. जिल्ह्यातील शेळगाव येथे गोदावरीवर खडका बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे, ज्याच्या पाण्याचा उपयोग परळी येथील वीजनिर्मिती प्रकल्पासाठी केला जातो. शेळगावनंतर वाड्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगाखेड शहरात गोदावरीचा प्रवेश होतो. येथील वाड्यांतील सव्वाहात गल्ली म्हणजेच दोन वाड्यांतील सव्वाहात रुंदीच्या गल्ल्या प्रसिद्ध आहेत.

त्याचबरोबर गंगाखेड हे संत जनाबाईंचे जन्मस्थान म्हणूनही ओळखले जाते. आपल्या प्रवासात पुढे पूर्णा नदी गोदावरीला डाव्या बाजूने येऊन मिळते आणि गोदावरी नांदेड जिल्ह्यात प्रवेश करते. गोदातीरावर वसलेल्या नांदेड शहरात शिखांचे १० वे गुरु श्री गुरु गोविंदसिंह यांचा गुरुद्वारा प्रसिद्ध आहे. त्यामुळे नांदेड हे शिखांच्या ५ पवित्र ठिकाणांपैकी एक आहे. नांदेड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जवळच गोदावरी नदीवर विष्णुपुरी बंधारा बांधण्यात आला आहे. तिकडे उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांचा प्रवास करून व महाराष्ट्र- तेलंगणा राज्याची सीमा बनलेली मांजरा नदी महाराष्ट्र – तेलंगणा राज्याच्या सीमेवर गोदावरीला जाऊन मिळते आणि गोदावरी नदी महाराष्ट्र राज्यातील सुमारे ६६८ किमीचा प्रवास संपवून तेलंगणा राज्यात प्रवेश करते.

गोदावरीचा महाराष्ट्रातील प्रवास संपला असला तरीही विदर्भातील अनेक उपनद्या गोदावरीला जाऊन मिळतात. त्यामुळे विदर्भातील नद्यांचे खोरे हे गोदावरीच्या खोऱ्यांचाच भाग आहे. त्याचाही थोडक्यात आढावा घेणे महत्वाचे आहे. विदर्भातील पैनगंगा, वैनगंगा व वर्धा या प्रमुख उपनद्या म्हणता येईल. पैनगंगेचा उगम हा बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगात होतो. बुलढाणा जिल्ह्यतील मेहकर हे तालुक्याचे ठिकाण पैनगंगेच्या तीरावर वसले आहेत. तेथील कंचनी महल प्रसिद्ध आहे. पुढे पैनगंगा ही वाशीम जिल्ह्यात प्रवेश करून जिल्ह्यातील वाशीम आणि रिसोड या दोन तालुक्यात पैनगंगेवर तब्बल ११ बंधारे बांधून सिंचन व्यवस्था निर्माण केली आहे. पुढे हिंगोली-यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर इसापूर धरण बांधण्यात आले आहे. ह्या धरणामुळे विदर्भ आणि मराठवाडा सीमावर्ती भागाला बराच फायदा झाला आहे. पैनगंगा नदी नांदेड-यवतमाळ जिल्ह्याची सीमा बनत आपले मार्गक्रमण करत पुढे जाताना यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीवर विलोभनीय असा सहस्रकुंड धबधबा आहे. नंतर यवतमाळ-चंद्रपूर जिल्ह्याची थोडीफार सीमा बनत जुगाद याठिकाणी पैनगंगा ही वर्धा नदीला जाऊन मिळते. विदर्भातील दुसरी महत्वाची नदी म्हणजे वर्धा नदी. मध्यप्रदेश मधील बैतुल जिल्ह्यातील मुल्ताई येथे सातपुडा पर्वतरांगेत उगम पावते. अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यात ती महाराष्ट्र राज्यात प्रवेश करते. अमरावती-वर्धा जिल्ह्याची सीमा बनलेल्या वर्धा नदीवर मोर्शी तालुक्यात अप्पर वर्धा धरण बांधण्यात आले आहे. अप्पर वर्धा धरणामुळे मोर्शी-वरुड भागात मोसंबी व संत्र्यांची शेती मोठ्या प्रमाणात विकसित झाल्याने परिसराला विदर्भाचे कॅलिफोर्निया म्हटले जाते. पुढे यवतमाळ- वर्धा , यवतमाळ -चंद्रपूर जिल्ह्याची सीमा बनलेल्या वर्धा नदीला सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जुगाद येथे पैनगंगा नदीला सोबत घेत चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करते. चंद्रपूर शहराच्या २० किमी दक्षिणेकडून वाहणाऱ्या याच वर्धा नदीच्या तीरावर बल्लारपूर शहर वसलेले आहे. बल्लारपूर शहर हे कागदनिर्मितीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पुढे चंद्रपूर-तेलंगणाच्या सीमेवर वर्धा नदीचा वैनगंगा नदीशी संगम होतो. त्यांनतर वर्धा आणि वैनगंगेच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता नदी म्हणून ओळखले जाते. तत्पूर्वी वैनगंगा ही दक्षिणवाहिनी नदी सुद्धा मध्यप्रदेशमधील शिवणी जिल्ह्यात उगम पावते. मध्यप्रदेशमध्ये उत्तराभिमुखी असणारी वैनगंगा मात्र पेंच अभयारण्यापासून मात्र दक्षिणवाहिनी होते. बालाघाटमार्गे आलेली ही नदी गोंदिया जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करते.

गोंदिया जिल्ह्याची उत्तरेकडील सीमेनंतर ती भंडारा जिल्ह्यात प्रवेश करते. भंडारा शहर सुद्धा वैनगंगेच्या तीरावर वसलेले आहे. त्यांनतर चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याची सीमा बनलेल्या वैनगंगा नदीचा पुढे तेलंगणाच्या सीमेवर वर्धा नदीशी संगम होऊन त्यांचा एकत्रित प्रवाह प्राणहिता नावाने ओळखला जातो. हीच प्राणहिता गडचिरोली आणि तेलंगणा राज्याची सीमा बनलेली आहे. तत्पूर्वी नांदेडपासून तेलंगणात गेलेली गोदामाय गडचिरोली जिल्ह्याच्या वेशीवर म्हणजेच सिरोंचाजवळ महाराष्ट्राच्या पुन्हा भेटीला येते. तेथेच प्राणहिता नदीचा गोदावरी नदीशी संगम होतो आणि गडचिरोली राज्याची दक्षिण सीमा बनते. त्याचबरोबर छत्तीसगढ मधून वाहत आलेली इंद्रावती नदी ही सुद्धा गडचिरोली आणि छत्तीसगढची आग्नेय सीमा होऊन ती सुद्धा गोदावरीला जाऊन मिळते. अशाप्रकारे गोदावरी नदी महाराष्ट्र राज्यातील प्रवास संपवून पुन्हा तेलंगणात प्रवेश करून पुढच्या प्रवासाला लागते.

पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातून तेलंगणा राज्यात प्रवेश केलेल्या गोदावरी नदी तीरावर निर्मल जिल्ह्यात बासर येथे प्रसिद्ध असे सरस्वती देवीचे मंदिर आहे. अनेक भाविक आपल्या लहान मुला-मुलींची शैक्षणिक प्रवासाची सुरुवात बासर येथील सरस्वतीच्या देवीच्या पूजा व दर्शनाने करतात. त्या पूजेला अक्षर-अभ्यासम किंवा विद्यारंभ पूजा म्हणतात. पुढे निर्मल-निझामाबाद जिल्ह्यांची सीमा बनलेल्या गोदावरी नदीवर निझामाबाद जिल्ह्यात श्रीरामसागर धरण व जलविद्युत प्रकल्प बांधण्यात आला आहे. याला पोचमपडू प्रकल्प म्हणून सुद्धा ओळखले जाते. श्रीरामसागर धरणामुळे तेलंगणातील करीमनगर, आदिलाबाद, वारंगल, नालगोंडा आणि खम्मम जिल्ह्याला लाभ झाला आहे. श्रीरामसागर प्रकल्पातून बाहेर पडल्यानंतर गोदावरीचे पात्र विस्तृत दिसायला लागते. पुढे मंचेरिआल जिल्ह्यात प्रवेश करते. मंचेरिआल हे जिल्ह्याचे ठिकाण गोदावरीच्या तीरावर वसलेले आहे. मंचेरिआलनंतर गोदावरी नदी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भेटीला येते. गडचिरोली जिल्ह्याच्या वेशीवर गोदावरीचा प्राणहिता नदीशी संगम होतो. गडचिरोलीची दक्षिण सीमा होऊन गोदामाय पुढील प्रवासाला लागते. भद्राद्री कोठागुडम जिल्ह्यात आल्यावर गोदातीरावर भद्राचलम येथे धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रसिद्ध असे श्री सीता रामचंद्रस्वामी मंदिर आहे. त्यामुळेच भद्राचलमला दक्षिण अयोध्या म्हणून सुद्धा ओळखले जाते.

पुढे काही अंतरावरच तेलंगणा राज्यातील प्रवास संपवून गोदावरी नदी आंध्रप्रदेश मध्ये प्रवेश करते. तत्पूर्वी सीमेवर तिला उजव्या बाजूने किन्नरसानी नदी येऊन मिळते.आंध्रप्रदेशमध्ये आल्यावर गोदावरीचा प्रवास पूर्व घाटाच्या पट्ट्यातून होतो. घाटातील पापी टेकड्या पार करण्यापूर्वी गोदावरी नदीला ओडिशा आणि छत्तीसगढमधून वाहत आलेली शबरी नदी डाव्या बाजूने येऊन मिळते. आंध्रात गोदावरी नदी ही पूर्व गोदावरी आणि दक्षिण गोदावरी या दोन जिल्ह्याची सीमा बनून वाहते. पुढे पूर्वघाटात गोदावरी पापीकोंडल घळईतून वाहते. पूर्वघाटादरम्यान गोदावरीचे पात्र अरुंद होते. पूर्व घाट ओलांडताच गोदावरी पुन्हा विस्तृत होते. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजमहेंद्री येथे गोदावरी नदी दोन शाखेत अर्थात दोन वितरिकेत विभागली जाते. त्या वितरिका म्हणजे गौतमी गोदावरी आणि वशिष्ठ गोदावरी होय. गौतमी गोदावरीला वृद्ध गोदावरी असे सुद्धा म्हणतात. गोदावरीच्या या दोन वितरिकेतून पुन्हा प्रत्येकी एकेक वितरिका वेगळी होऊन वाहते. वशिष्ठ गोदावरीतून वैनतेय तर गौतमी गोदावरीतून निलारेऊ नावाच्या वितरिका वेगळ्या होतात. गौतमी गोदावरी ही पूर्व गोदावरी जिल्ह्यातील मात्र राजकीय दृष्ट्या पुद्दुचेरीचा भाग असलेल्या यानम येथे, तर निलारेऊ गोदावरी ही मुल्लापलेम येथे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तसेच वशिष्ठ गोदावरी नदी पूर्व गोदावरी जिल्ह्यातीलच अंतरवेदी येथे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, तर वैनतेय गोदावरी वोडलरेऊ येथे समुद्राला जाऊन मिळते.

अशाप्रकारे गोदावरीचे चार प्रवाह मिळून बंगालच्या उपसागरानजीक १७० किमीचा त्रिभुज प्रदेश तयार करतात. हा त्रिभुज प्रदेश जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध प्रदेश म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश असा तीन राज्यातील १४६५ किमीचा प्रवास संपवून नव्हे तर तीन राज्यांना समृद्ध करून गोदामाय बंगालच्या उपसागराला कडाडून मिठी मारत कायमची विलीन होते, ते ही कसलाही लोभ न ठेवता….

– शेती प्रश्नांचे अभ्यासक माणिक कदम याच्या अभ्यासातून..

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: गोदावरी नदीदक्षिण गंगामहाराष्ट्र
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

पोटाच्या समस्येने त्रस्त असाल तर हा दिनक्रम करा, या चार सवयी तुम्हाला देतील चांगले फायदे

Next Post

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्याराशीसाठी

Next Post
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्याराशीसाठी

Recent Posts

  • फडणवीसांनी अडीच वर्षांपूर्वीच मोठं मन दाखवायला हवं होतं
  • दोनशे बिहारी आणून.’, म्हणत कूकने अभिनेत्री माही विजला दिली धमकी
  • “फडणवीस हे एकनाथ शिंदेंचे उजवे हात, दोघांनी मिळून राज्य पुढे न्यावं”
  • शरद पवारांना इनकम टॅक्सची नोटीस; नेमकं काय आहे कारण?
  • “देवेंद्र फडणवीस ज्युनिअरच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील हे स्वप्नातही वाटलं नाही”

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group