टेनिसपटू लिएंडर पेस घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी असल्याचा निकाल महानगर कोर्टानं दिला आहे. पेसवर त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि लिव्ह-इन-पार्टनर रिया पिल्लईनं २०१४ साली हे आरोप केले होते. सदर प्रकरणात कोर्टानं हा निर्णय दिला आहे. कोर्टानं यावेळी रियाला दर महिन्याचे घर भाडे देण्याचा आदेशही दिला आहे. ६ वर्षांपेक्षा जास्त काळ या प्रकरणाची सुनावणी झाली.
टेनिसपटू लिएंडर पेस आणि अभिनेत्री-मॉडल रिया पिल्लई यांनी दीर्घ काळ एकमेकांना डेट केले. त्यानंतर ते जवळपास ८ वर्ष लिव्ह इनमध्ये होते. या काळात त्यांना मुलगी देखील झाली. तिचे नाव अकीरा आहे. रियानं २०१४ साली पेसवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत कोर्टामध्ये केस दाखल केली होती. पेसनं आपल्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तिनं केली होती.
तसेच कोर्टाने सुद्धा पेसनं रियाचं भावनिक आणि आर्थिक शोषण केल्याचं मान्य केलं आहे. तसंच पेसला दर महिना रियाला घरभाडं म्हणून महिना ५० हजार रूपये आणि घराच्या देखभालीसाठी १ लाख रूपये देण्याचे आदेश दिले आहेत. रिया पेससोबत एकाच घरामध्ये राहिली तर तिला हे पैसे मिळणार नाहीत, असंही कोर्टानं स्पष्ट केलंय. पेसची टेनिस कारकिर्द जवळपास संपुष्टाच आली आहे. त्यामुळे त्याला भाड्याच्या घरात राहण्याचा आदेश देता येणार नाही, असंही कोर्टानं या निकालामध्ये सांगितले आहे.