नवी मुंबई | नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मनसे शहराध्यक्ष गजानन काळे याच्यावर झालेल्या आरोपांमुळे मनसेच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत. कारण घरगुती हिंसाचार व जातीवाचक शेरेबाजीचा आरोप असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या अटकेसाठी त्यांच्या पत्नीने आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्याकडे धाव घेतली आहे.
संजीवनी काळे आणि त्यांच्या परिवाराने मंगळवारी रामदास आठवले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. संजीवनी काळे यांच्या खळबळजनक आरोपांनंतर गजानन काळे फरार झाले होते. विशेष म्हणजे मागील ६ दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांची दहा पथके गजानन काळे यांचा शोध घेत आहेत
. गजानन काळे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लवकरच ते पोलिसांच्या ताब्यात असतील, असा विश्वास नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी व्यक्त केला. गुन्हा दाखल झाल्यापासून गजानन काळे यांचा मोबाईल फोन स्वीच ऑफ आहे. गेल्या काही दिवसांत हे प्रकरण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही संजीवनी काळे यांना पाठिंबा दर्शविला होता