गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख

अहमदाबाद: गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे आज निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना अहमदाबादच्या स्टर्लिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचारही सुरु होते. मात्र आज (गुरुवार) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना विषाणूची लागणही झाली होती. त्यावर त्यांनी मात देखील केली होती. पण त्यानंतर काही दिवसांनी त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला होता. कालपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली.


दरम्यान, केशुभाई पटेल यांच्या निधनाबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी शोकग्रस्त कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन ज्येष्ठ नेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

केशुभाई पटेल हे गुजरातमधील ज्येष्ठ नेते होते

केशुभाई पटेल हे गुजरातमधील भाजपाच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. जनसंघाच्या काळापासून पक्षाशी संबंधित असलेले केशुभाई पटेल हे १९९५ मध्ये पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री बनले होते. यावेळी गुजरातमध्ये प्रथमच भाजपचे सरकार स्थापन झाले होते. परंतु, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊ शकला नव्हता. 

ते दुसऱ्यांदा १९९८ मध्ये पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री झाले. पण यावेळी देखील त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. २००१ मध्ये त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते.  नरेंद्र मोदी यांनी केशुभाई पटेल यांच्याबरोबर गुजरातच्या राजकारणामध्ये दीर्घकाळ काम केले. 

ग्लोबल न्युज नेटवर्क: