मुंबई | मागच्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असल्याचे दिसून येत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये याच मुद्द्यावरून राजकारण सुरु आहे अशातच आता मराठा आरक्षणासाठी आजपासून खासदार छत्रपती संभाजीराजे आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. तर दुसरीकडे राज्यातील मराठा संघटना सुद्धा आक्रमक झाल्या आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरात मराठा समाजाच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करम्यात आले.
कोल्हापुरातील शिवाजी पुलावर मराठा कार्यकर्ते एकवटल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मराठा समाजाच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केले. रास्ता रोको केल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. वाहनांच्या लांबच लाबं रांगा लागल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे काही वेळासाठी ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली होती.
दरम्यान, खासदार संभाजीराजे छत्रपती हे आजपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आझाद मैदानावर संभाजीराजे उपोषण करत आहेत. १५ फेब्रुवारीला त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती दिली होती. एकटे संभाजीराजे जरी उपोषणाला बसणार असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.
संभाजीराजेंना पाठबळ म्हणून अनेक ग्रामपंचायत, संघटना, तालीम संस्थांमार्फत ग्रामीण, शहर, तालुका, जिल्हा पातळीवर बैठका होत आहेत. केवळ मराठा समाजच नव्हे, तर बहुजन समाजातील लोकांकडूनही मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून याबबतची ठराव पत्रे सकल मराठा समाजाकडे पाठविली असून, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केली जात आहेत.