मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांना स्थान मिळालं असून त्यांच्याकडे लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नारायण राणे यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यातून अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं होत. तसेच काल पुण्यात संवाद साधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा आपण शुभेच्छा देण्यासाठी त्यांना आणि त्यांच्या मुलांना फोन केला असताना दोघांचे फोन नॉट रिचेबल लागत असल्याचे राज ठाकरे यांनी बोलून दाखविले होते.
मात्र आज सोमवारी सकाळी नारायण राणे यांना फोन करून त्यांच्या नव्या मंत्री पदासाठी राज ठाकरे यांनी नारायण राणे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आज सकाळी या दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरुन चर्चा झाली. मात्र, याशिवाय दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही राजकीय स्वरुपाची चर्चा झाली का, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यात पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन केले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी राज यांना तुम्ही नारायण राणे यांना शुभेच्छा दिल्यात का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर राज ठाकरे यांनी माझा नारायण राणे यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नाही, असे म्हटले होते. नारायण राणे यांना मी फोन केला होता. त्यांचे दोन्ही फोन आणि त्यांच्या मुलांचे फोन बंद होते. उद्या परवा नारायण राणे यांच्यासोबत बोलणं होईल, असं राज ठाकरे म्हणाले होते.