मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे किंगमेकर शरद पवार यांनी अखेर महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची समजूत काढली आणि शेवटी माजी महापौर महेश कोठे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.याबाबत त्यांनी ट्विट करत यांची माहिती दिली आहे.
माजी महापौर महेश कोठे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश आज सकाळी 11 वाजता होणार होता दरम्यान मनसेचे नेते युवराज चुंबळकर यांच्यासह अनेक जणांचा प्रवेश झाला होता.तथापि महेश कोठे यांचा प्रवेश लटकला होता.
महेश कोठे यांच्या प्रवेशापूर्वी शरद पवार यांनी कोठे यांच्या समवेत बैठक घेतली या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते महेश गादेकर तसेच दिलीप कोल्हे आदी मोजके नेतेच उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार यांनी महेश कोठे यांना राष्ट्रवादी प्रवेश दिला.
महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेश आणि या पक्षाची ताकद सोलापुरात वाढेल, सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत कोठे यांच्या नेतृत्वाचा फायदा राष्ट्रवादीला होईल असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
श्री. कोठे व त्यांचे सहकारी सार्वजनिक जीवनात लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी झटत असतात. यांची सामूहिक शक्ती प्रगत विचाराला मदत करणारी आहे. pic.twitter.com/oyoU16dfAB
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 8, 2021
कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेश लटकल्यानंतर त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. तथापि कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेश झाल्यानं आता कोठे गटांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.