शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर करण्यात आली.यानंतर यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. युतीच्या घोषणेनंतर दोनच दिवसांत संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. तसेच वंचितसोबतच्या युतीमुळे शिवसैनिक नाराज असल्याचा दावाही केला जात आहे. यातच शरद पवार यांनीही ठाकरे गट आणि वंचितच्या युतीवर भाष्य केले. यावर प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
युती केल्यापासून मागील काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीत काही खटके उडताना दिसत आहेत, काही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याकडे आपण कसे पाहता? असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांना विचारण्यात आला. यावर, प्रश्न तो नाही, प्रश्न असा आहे की माझी युती शिवसेनेबरोबरची आहे आणि ती कायम आहे. त्यामुळे मी तिथपर्यंतच मर्यादित आहे आणि मला इतराचे काही देणेघेणे नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली.
महाविकास आघाडीत जाण्याची इच्छा नाही का? असा प्रश्नही आंबेडकरांना विचारण्यात आला. यावर, तो मुद्दा मी ज्यावेळी स्पष्ट करायचा तेव्हा मी करेन, आता मी काही त्यावर बोलत नाही. मला जे बोलयाचे होते ते मी बोललो आहे. माझ्या पक्षाने काय बोलवे हे माझा पक्ष ठरवतो. आमच्या दृष्टीने जे आम्हाला मांडायचे होते, ते मांडून झालेले आहे. पुढचा काळ जसा जाईल त्यानुसार आम्ही त्यावर प्रतिक्रिया देत राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.