महाराष्ट्राचं लक्ष्य नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवार कोण असणार, याकडे लागले होते. आता याबाबत सस्पेन्स अखेर संपला आहे. काँग्रेसकडून (Congress) अधिकृत उमेदवारी मिळालेले सुधीर तांबेयांनी आपले पुत्र सत्यजित तांबे यांच्यासाठी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या सर्व घडामोडीवर सामनाच्या अग्रलेखातून तांबे यांच्यावर टीका करण्यात आली.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अग्रलेखात म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदारसंघात ‘तांबे’ मंडळींची तयारी आधीपासूनच सुरू होती व गेल्या महिन्यात एका जाहीर कार्यक्रमात श्री. फडणवीस यांनी तसे संकेतही दिले होते, पण काँग्रेस नेतृत्वास जाग आली नाही व एका आमदारकीसाठी तांबे यांनी प्रतिष्ठा घालवली, अशा शब्दात राऊत यांनी अग्रलेखातून खडेबोल सुनावले.
या सगळ्यात गोंधळ उडाला तो महाविकास आघाडीचा. वास्तविक महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षकांना भाजपविरुद्ध रोष व्यक्त करायचा होता. भाजपला सुशिक्षित वर्गाचा अजिबात पाठिंबा नाही व सगळेच शिक्षित त्यांच्या भगतगणांत मोडत नाहीत हे दाखवायची आयतीच संधी मिळाली होती, पण फासे उलटे पडताना दिसत आहेत. तरीही मैदान सोडता येणार नाही.
नाशिक पदवीधर, कोकण शिक्षक, अमरावती पदवीधर, नागपूर शिक्षक आणि संभाजीनगर शिक्षक अशा पाच मतदारसंघांत या निवडणुका होत आहेत. पाचपैकी तीन जागा महाविकास आघाडीकडे आणि दोन जागा भाजपकडे होत्या. महाविकास आघाडीने समन्वय आणि नियोजन या सूत्राने काम केले असते तर या वेळी तीन जागा कायम राखून एक जागा जास्त जिंकता आली असती, पण आता आहे ते सुद्धा गमावण्याची वेळ आली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात तर सगळेच उलटे पालटे घडले. काँग्रेस उमेदवार विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अचानक मारलेली पलटी धक्कादायक आहे.