बॅ. नाथ पै यांचा लोकशाही प्रणालीवर प्रचंड विश्वास होता. आजही आपल्या देशात लोकशाही टिकून आहे जो घटक विकासापासून दूर असेल, त्याला विकासाच्या प्रक्रियेत आणले पाहिजे. तेथील प्रश्न एका विचाराने सोडविले तरच समृद्ध लोकशाही असलेला देश आणखी बळकट होईल, असे मत माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले.
पवार शनिवारी वेंगुर्ले येथील बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार बाळाराम पाटील, बॅ. नाथ पै यांची नात अदिती पै, शैलेंद्र पै, पद्मश्री परशुराम गंगावणे, बॅ. नाथ पै यांचे मित्र विठ्ठल याळगी, आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, बॅ. नाथ पै गरीब कुटुंबात जन्माला आले. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले असल्याने आईने छोटी-मोठी कामे करून या सात भावंडांना मोठे केले. काही अंतराने बॅ. नाथ पै बेळगाव येथे गेले. तेथे त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. त्यांचे सुरुवातीचे आयुष्य पूर्णपणे संघर्षातून गेले. नंतर पुढे ते इंग्लंड येथे गेले आणि तेथील काही आंदोलनात भाग घेतला, अभ्यास केला.
त्यानंतर ते भारतात आले तेव्हा बेळगाव येथून विधानसभा निवडणूक लढले; परंतु पराभूत झाले. मात्र, ते मागे हटले नाहीत. पुन्हा इंग्लंड येथे गेले आणि नंतर जेव्हा पुन्हा इकडे आले, तेव्हा समाजवादी विचारसरणीत सक्रिय सहभाग घेतला. राजापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले आणि त्यांनी प्रगल्भ विचार देशाला दिले आणि ते आजही आपण पुस्तकरूपाने वाचत आहोत, असे ते म्हणाले.