दसरा मेळाव्याची तारीख जशी जवळ आली आहे, तसतशी शिवसेना आणि शिंदे गटात प्रचंड चुरस वाढली असून प्रत्येक गटाकडून आपलाच दसरा मेळावा प्रचंड होणार असल्याचं छातीठोक सांगितलं जात आहे. त्यासाठी दोन्ही गटाने जय्यत तयारी सुरू केली आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करण्यासाठी खेड्यापाड्यातून लोक आणण्यापासून वाहने बूक करण्यात येत आहेत. त्याशिवाय आपल्याच मेळाव्याला जास्त गर्दी व्हावी यासाठी दोन्ही गटाकडून वेगवेगळ्या आयडिया लढवल्या जात आहेत.
त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचा दसरा मेळाव्याचा टीझर लॉन्च झाला आहे. शिंदे गटाच्या या टीझरला तोडीस तोड देणारा नवा टीझर शिवसेनेने व्हायरल केला आहे. या टीझरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर फोकस ठेवण्यात आला असून जुन्या दसऱ्या मेळाव्याची क्षणचित्रेही यात दाखवण्यात आली आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेत चैतन्य संचारलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. येत्या 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता हा दसरा मेळावा पार पडणार असून या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचंच प्रमुख भाषण होणार आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेचा हा टीझर अवघ्या 35 सेकंदाचा आहे. या टीझरच्या सुरुवातीलाच भगवे झेंडे आणि शिवसेनेच्या वाघाचे फोटो दाखवण्यात आले आहेत. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दाखवण्यात आला आहे. या शिवाय जुन्या दसऱ्या मेळाव्याची प्रचंड गर्दी या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे.
वाजत गाजत, गुलाल उधळत या… पण शिस्तीत या! 🚩 https://t.co/KyQWJVymZG
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) September 30, 2022