निवडणूक आयोगासमोर शिंदे आणि ठाकरे गटाचा तिढा सुरु आहे. दोन्हही प्रकरणांवर तारीख पे तारीख सुरु असताना शिंदे गटातील अनेक नेते धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळणार असल्याचा दावा करत आहेत. यातच आता अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनाच मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. अमरावतीमध्ये युवा स्वाभिमानने आयोजित केलेल्या कृषी महोत्सवादरम्यान त्या बोलत होत्या.
“हनुमान चालीसा वाचल्यामुळे आम्हाला जेलमध्ये टाकलं म्हणून आम्ही खचून जाऊ असं नाही माझा हनुमान चालीसावर पूर्ण विश्वास आहे,माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. पुढील निवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेनाच मिळेल” असं नवनीत राणा म्हणाल्या. उद्धव ठाकरे हे कोरोना काळात फेसबुकवरून सरकार चालवत होते,माझ्याबद्दल नकारात्मक बोलणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही असंही नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.
धनुष्यबाण आणि शिवसेना कोणाची या मुद्द्यावरून दोन्हही गटांकडून निवडणूक आयोगासमोर सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. एकनाथ शिंदे गटाची बाजू देखील आयोगाने ऐकून घेतली आहे. तर आमदारांच्या अपात्रतेबाबतचा लढा देखील न्यायालयात सुरु आहे. १४ फेब्रुवारी रोजी त्याची पुढील सुनावणी देखील होणार आहे. त्याआधी अनेकदा शिंदे गटाकडून आम्हालाच धनुष्यबाण चिन्ह मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.