नवी मुंबई | माथाडी कामगारांच्या शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची निवेदनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊनही प्रश्न मार्गी लागले नाही.त्यामुळे उद्या १ फेब्रुवारीला माजी आमदार आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे उपोषणाला बसणार आहे. मंत्री दर्जाबद्दल एकनाथ शिंदेंनीच घोषणा केली होती. त्यांचं हे उपोषण सरकारला घरचा अहेर मानला जात आहे.
माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या कामगार, गृह, पणन-सहकार, नगरविकास, महसूल व अन्य खात्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे महाराष्ट्र शासन व संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम माथाडी कामगारांचा निषेधार्थ 01 फेब्रुवारी 2023 रोजी नाईलाजास्तव लाक्षणिक संप पुकारला असल्याचे नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी जाहीर केले आहे.
माथाडी कामगारांच्या शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची निवेदनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री, संबंधित विभागाचे प्रधान सचिव, कामगार आयुक्त, माथाडी बोर्ड व अन्य संबंधितांकडे सादर केलेली आहेत, यासंदर्भात अनेक वेळा संयुक्त बैठका झाल्या, प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे म्हणून संप, मोर्चे, उपोषणे यासारखी आंदोलनं केली, परंतु माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न तसेच्या तसे पडून असल्याचे नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
दैनिक सकाळच्या वर्धापन दिनानिमित्त रविंद्र नाट्य मंदिर, दादर, मुंबई येथे सकाळ सन्मान पुरस्कार गौरव कार्यक्रमाच्या वेळी देखिल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप पुकारला असल्यासंबंधीचे नोटीस व प्रश्नांचे निवेदन सादर केले आहे. परंतु याबाबत सरकारने गांभिर्याने विचार केलेला नाही, असेही नरेंद्र पाटील म्हणाले.