राज्यसभा निवडणुकीतील राजकीय नाट्य घडामोडीनंतर भारतीय जनता पक्षाच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला असून शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. याविजयानंतर कोल्हापूर जिल्ह्यात महाडिक समर्थकांसह भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. या विजयामुळे महाडिक गटाला पुन्हा बळ मिळाले आहे. यासर्व घडामोडीतच माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली.
महाडिक म्हणाले की, ही लोकसभेची रंगीत तालीम आहे असे समजून या निवडणुकीत आम्ही उतरलो, महाडिकांना लढायची सवय आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, अशा शब्दात महादेवराव महाडिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली. इतकच नाही तर, उद्या मुन्नाची मिरवणूक बघा असे सांगत पुढील राजकारणाचे संकेतच दिले.
महाडिक म्हणाले, जिंकणं आणि हरणं यावर महाडिक कुटुंबाचं संकट नाही. ज्यावेळी तो (देव) संकट आणेल त्यावेळी महाडिक संकटात येईल, अन्यथा महाडिकांना कोणी संकटात आणू शकणार नाही. माझं नाव महादेव, नावच परमेश्वराचं आहे, त्याला कोणी धक्का पोहोचवू शकत नाही असे ते म्हणाले.