काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील अकोला येथील पत्रकार परिषदेत सावरकर यांच्याविषयी घणाघाती टीका केली. त्यांच्या या टीकेवरून राजकारण सध्या चांगलेच तापलेले आहे. त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत जोडे मारो आंदोलन केले जात आहे. दरम्यान, त्यांच्या या टीकेमुळे राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
अशातच महाविकास आघाडीतील काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनाने राहुल गांधींच्या वक्तव्यावर असहमती दर्शवली आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत फूट पडू शकते असा सूचक इशारा काँग्रेसला दिला आहे. राऊतांच्या या विधानावर चर्चेला उधाण आले असता, आता त्यांच्या या विधानावर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सचिन सावंत म्हणाले, मला असे वाटते की या संदर्भात सगळ्यांनी विचार करायला हवा. ज्या कारणाने आम्ही एकत्र आलो, त्या करणापूर्वी वैचारिक मतभेद दोन्ही पक्षांमध्ये होते हे स्पष्ट आहे. तुम्हाला कोणती व्यक्ती आवडते त्यामुळे एकत्र आलो नव्हतो, देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र आलो होतो. शिवसेना ज्यावेळी कुठलाही विषय मांडते, त्यावेळी ते विषय लोकशाही आणि संविधानाच्या परिघातले नसले तर ते आम्हाला आवडतात असे नाही. त्यामुळे हा विषय देशातील सर्वोच्च गोष्टी काय आहे, जनतेला काय वाटते या दृष्टीने पक्षाने विचार करावा, असे ते म्हणाले
दरम्यान, सावरकरांबद्दल राहुल गांधी जे बोलले त्यामध्ये कुठल्याही प्रकारची ऐतिहासिक मोडतोड नाही ते सत्य आहे. त्यामुळे सत्य कटू असले तरी ते सत्यच असते. त्याला आता काय करणार, आपण त्याला बदलू शकत नाही. देश चालत असताना तो गांधींच्या विचाराने चालावा, तो सावरकरांच्या विचाराने चालूच शकत नाही, अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे सावंत यांनी यावेळी सांगितले.