(प्रतिनिधी : निकिता शिंदे ) सध्या सर्वत्र ऑनलाइन शॉपिंगचे वारे वाहू लागले आहे. तसेच ऑनलाइन शॉपिंगमुळे फसवणुकीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात आता फ्लिपकार्टमध्ये काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉयनेच आपल्या कंपनीला लाखोंचा चुना लावला आहे.
कंपनीचा डिलिव्हरी बॉय आपल्या साथीदारांसोबत महागड्या वस्तू चुकीच्या पत्त्यावर मागवून त्या प्रत्यक्ष ग्राहकांना न देता मध्येच हडप करून लाखो रूपयांचा चुना फ्लिपकार्ट कंपनीला लावला होता. या प्रकरणी पोलिसांनी कंपनीचा डिलिव्हरी बॉय संघपाल मोरे याला अटक केली आहे.
प्रकरण असे की संघपाल मोरे आणि त्यांचे जोडीदार महागड्या वस्तू चुकीच्या पत्यावर मागवत असत. त्यानंतर डिलिव्हरीच्या बहाण्याने चुकीचा पत्ता म्हणून पुन्हा कंपनीमध्ये जमा करत होते मात्र कंपनीमध्ये जमा करण्यापूर्वी मोरे आणि त्यांचे साथीदार त्यातील महागडया वस्तू काढून घेऊन त्यात साबण, दगड, बटाटे अशा वस्तू भरून कंपनीत जमा करत होते.
या प्रकारामुळे कंपनीला मोठा नुकसानाचा सामना करावा लागत होता. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस स्थानकामध्ये गुन्हा देखील नोंद करण्यात आला होता. पुढे पोलिसांनी कसून तपस केल्यानंतर या प्रकरणात मोरे आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती.