मुंबई | एल्गार परिषद प्रकरणातील संशयित आरोपी स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूनंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुस्कटदाबी करणाऱ्या जागतिक नेत्यांच्या यादीत नरेंद्र मोदी यांचे नाव प्रसिद्ध होत असताना मुंबईत फादर स्टॅन स्वामी यांचा तडफडून आणि गुदमरून मृत्यू झाला, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका सामनाच्या अग्रेलकेहटुन केली होती. आता मोदींवर केलेल्या टीकेचा भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
ज्या प्रकारे इंदिरा गांधी जॉर्ज फर्नांडिस यांना घाबरत होत्या तसंच पंतप्रधान मोदी हे स्टॅन स्वामी यांना घाबरत होते, याचा जावाई शोध राऊत यांनी लावला, असं म्हणत चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे . वाघ यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.
नक्षलवाद्यांना चिनी ड्रॅगन रसद पुरवत असतात पण मोदी त्यांना घाबरत नाही, मग यांना स्वप्नात सुद्धा घाबरतील का? समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा विरोध करणे याला घाबरणे कसं म्हणणार, असंही त्या म्हणाल्या आहेत. दैनिक सामना हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आला. पण त्यांच्या विचारांना बगल देत संजय राऊत स्वत:च्या फायद्यासाठी गैरवापर करत आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केला होता.