कोल्हापूरचे म्हटले की, येथे तर सर्वच खेळांना मोठ्या उत्साहाने लोकं पाहतात आणि खेळतात. फुटबॉल, कुस्ती असो किंवा क्रिकेट येथील लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. दरम्यान, याच कोल्हापूरच्या एका सातवीच्या वर्गात शिकणार पोरग क्रिकेटच्या वेडापायी कोट्याधीश बनलाय.अगदी बारा ते तेरा वर्ष वय असलेला सक्षम मागील दोन दिवसांपासून तुफान चर्चेत राहिलाय. त्याला क्रिकेट खेळाचे प्रचंड वेड असून एमएस धोनी हा त्याचा आवडता खेळाडू आहे.
सक्षमने त्याच्या क्रिकेट खेळातील ज्ञानामुळे तब्बल ७० लाख रुपये जिंकले आहेत. मंगळवारी शाळेला सुट्टी असल्याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यासाठी सक्षमने बेस्ट प्लेअर निवडले आणि टीम बनवली होती. यावेळी सामन्यानंतर त्याला सर्वाधिक पॉईंट्स मिळाले आणि प्रथम क्रमांकाचे बक्षीसही मिळाले. मात्र, या बक्षीसाची रक्कम तब्ब्ल ७० लाख एवढी होती. सामना संपल्यानंतर अर्धा तासात सक्षमच्या आईच्या बँक खात्यावर सुमारे सत्तर लाख जमा झाले. ही बातमी पसरायला सुरुवात झाली आणि अख्खे घर पाहुण्यांनी, सत्कार करणाऱ्यांच्या गर्दीने भरून गेले.
मागील काही काळात अनेकजण क्रिकेट खेळात ऑनलाईन गेमवर पैशे लावतात. मात्र सक्षम अशा ऑनलाईन गेमवर पैशे लावणाऱ्या वर्गातील मुळीच नव्हता. त्याने याअगोदर कधीही अशाप्रकारे हा खेळ खेळलेला नाही. मात्र, त्याच्याकडे क्रिकेट खेळाचे चांगल्याप्रकारे ज्ञान आहे. सक्षमला भारतीय खेळाडूंबरोबरच विदेशी खेळाडूंचीही कुंडली चांगल्याप्रकारे माहिती आहे. कोणता खेळाडू कशाप्रकारे खेळतो खेळाडूची खेळण्याची पद्धत या सर्व गोष्टी त्याला बरोबर माहित आहेत.
सक्षम तसा शैक्षणिक दृष्ट्या ही सक्षम आहे. येथील मुरगूड विद्यालयात तो सेमीच्या सातवीच्या वर्गात शिकतो आहे.तर पाचवी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत तो चमकला आहे. त्याच्या शाळेतील शिक्षकांनी त्याचा सत्कार व कौतुक केले. त्याचबरोबर शिक्षकांनी त्याला पुन्हा असा प्रकार न करण्याची ताकीदही दिली. सक्षमचे सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याचे स्वप्न आहे, असे त्याने सांगितले.