काँग्रेसच्या उमेदवाराला मत दिल्याने भाजप आमदार निलंबित

 

क्रॉस व्होटिंग करत काँग्रेसच्या उमेदवाराला मत दिल्यामुळे भाजपच्या आमदार शोभरानी कुशवाह यांना निलंबित करण्यात आले आहे. शुक्रवारी राजस्थानमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने तीन जागांवर विजय मिळवत भाजपाला मोठा धक्का दिला आहे. राजस्थानमधील राज्यसभा निवडणुकीत भाजपला अवघी 1 जागा जिंकता आली आहे.

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तिवारी यांच्या बाजूने क्रॉस व्होटिंग केल्याबद्दल भाजपने राजस्थानच्या आमदार शोभरानी कुशवाह यांना निलंबित केले आहे. पक्षाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. धोलपूरच्या भाजप आमदार शोभराणी कुशवाह यांनी भाजपच्या घनश्याम तिवारी यांच्या ऐवजी काँग्रेसच्या प्रमोद तिवारी यांना मत दिले. कुशवाह यांनी काँग्रेसला आपले मत चुकून दिले की राजस्थान भाजपमधील अंतर्गत कलहामुळे त्यांनी काँग्रेसला मतदान केले, याबद्दल चर्चांना उधाण आले आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी निवडणूक निकालांची अधिकृत घोषणा होण्याआधीच त्यांच्या पक्षाच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करणारे ट्विट केले होते. गेहलोत यांनी लिहिले की, राजस्थानमधील राज्यसभेच्या तीन जागांवर काँग्रेसचा विजय हा लोकशाहीचा विजय आहे. प्रमोद तिवारी, मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला या तीन नवनिर्वाचित खासदारांचे मी अभिनंदन करतो. मला पूर्ण विश्वास आहे की तिन्ही खासदार दिल्लीत राजस्थानच्या हक्काचे रक्षण करण्यास सक्षम असतील.

Team Global News Marathi: