उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सत्तेत असलेल्या भाजपाला सत्तेतून खाली उतरवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. त्यातच पहिल्यांदाच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस यूपीत निवडणूक लढवत आहे.
या निवडणुकीत प्रचार कॅम्पेनमध्ये काँग्रेसनं आधीच बाजी मारली. लडकी हूँ, लड सकती हूँ अशा आशयाची पोस्टर्स यूपीत अनेक ठिकाणी झळकली परंतु आता यावरुन वादंग निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या कॅम्पेन गर्लमधील पोस्टर गर्ल डॉ. प्रियंका मौर्यनं प्रियंका गांधींच्या सचिवावर तिकिटीसाठी पैसे घेत असल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसमध्ये तिकिटाचा बाजार चालला आहे. शुक्रवारी या पोस्टर गर्लनं ट्विट करुन म्हटलंय की, लडकी हूँ, लड सकती हूँ पर तिकीट मिळू शकत नाही. कारण मी ओबीसी आहे आणि प्रियंका गांधींचे सचिव संदीप सिंह यांना लाच देऊ शकत नाही. माझ्याकडे व्हिडिओ पुरावे आहेत असा दावा तिने केला आहे.
तसेच काँग्रेस पार्टीत सुरु असलेल्या अशा राजकारणाविरोधात कुणीही बोलण्याची हिंमत ठेवत नाही. पैसे न दिल्याने सरोजनीनगर मतदारसंघातून त्यांना तिकीट नाकारण्यात आले. कॅम्पेन फक्त दिशाभूल करण्यासाठी आहे. लोकं म्हणतील तिकीट मिळालं नाही म्हणून मी बोलतेय असंही त्यांनी स्पष्ट केले.