काँग्रेस आणखी गोंधळात: निकाल सांगतोय काँग्रेस ग्राउंड लेव्हलवर नाहीच : पी. चिदंबरम

काँग्रेस आणखी गोंधळात: निकाल सांगतोय काँग्रेस ग्राउंड लेव्हलवर नाहीच : पी. चिदंबरम

बिहार निवडणूक आणि अन्य राज्यांतील पोटनिवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या कामगिरीवर पक्षातीलच वरिष्ठ नेते आता प्रश्न उपस्थित करत आहेत. याबाबत पी. चिदंबरम यांनीही तोंड उघडले.

काँग्रेसचं तळागाळातील संगठन कमकुवत पडलंय. प्रत्येक स्तरावर आत्मपरीक्षणाची गरज आहे, असे काँग्रेसचे नेते चिदंबरम यांनी सांगितले. ‘भास्कर’ला दिलेल्या एका एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीत त्यांनी ही बाब उघड केली. ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी गांधी परिवाराशी संबंध नसलेल्या व्यक्तीस अध्यक्षपदासाठी प्राथमिकता देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ऑल इंडिया काँग्रेस कमिटी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करेल हे आता सांगता येणार नाही. नुकत्याच पार पडलेल्या बिहार मधील निवडणुकांच्या निकालासंदर्भात काँग्रेसच्या सद्य:स्थितीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना माजी अर्थमंत्री चिदंबरम यांनी उत्तरे दिली…

बिहार निवडणुकीच्या निकालाने काँग्रेसला कोणता संदेश दिला ?

संदेश नक्कीच मिळाला, गैर-भाजप आघाडी ही भाजपच्या बरोबरीने मतं मिळवू शकते. पण भाजप आघाडीच्या तुलनेत जागांच्या बाबतीत आणखी समोर जाण्यासाठी आम्हाला आणखी तळागाळापर्यंत पोहोचून आघाडी मजबूत करावी लागेल. जमिनीशी पकड चांगली असली तर अनेक लहान पक्षसुद्धा यश मिळवू शकतात, हे भाकपा-माले आणि एआयएमआयएमने दाखवून दिलंय.

काँग्रेस महाआघाडीची कमकुवत कडी मानली गेली, आपण याच्याशी सहमत आहात?

मला वाटतं काँग्रेस ने बिहारमध्ये स्वबळावर निवडणूक लढली. त्यात काँग्रेसने काबीज केलेल्या २५ जागा अशा होत्या, ज्यांवर गेल्या २० वर्षांपासून भाजप किंवा त्यांना सहकार्य करणारे जिंकत आले. या जागा लढण्यास काँग्रेसने नकार द्यायला हवा होता. केवळ ४५ उमेदवारच रिंगणात उतरवायला हवे होते. आता केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, पश्चिम बंगाल आणि आसामच्या निवडणुका समोर आहेत. आता याठिकाणी काय निकाल लागतात याकडे आता लक्ष लागले आहे.

कोरोना आणि आर्थिक मंदीचे मुद्दे असतानाही बिहार आणि पोटनिवडणुकीत चांगली कामगिरी का नाही झाली ?

मी गुजरात, म. प्र., यूपी आणि कर्नाटकातील पोटनिवडणुकीतील निकालांनी अधिक चिंतीत आहे. हे निकाल सांगतात की, जनसामान्यांवरील पक्षाची पकड सैल किंवा कमकुवत झाली आहे. बिहारमध्ये राजद-काँग्रेससाठी जमीन उपजाऊ होती.आम्ही विजयाच्या अगदी जवळ असताना का हरलो, याची व्यापक समीक्षा झाली पाहिजे. ध्यानात ठेवा! काँग्रेसने राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि झारखंडमध्ये विजय मिळवला होता,याला फार काळ लोटलेला नाही.

बिहारमधील मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचे आरोपही केले जात आहेत ?

मला तपशील माहित नाही. जगभर अशी प्रथा आहे की, जय आणि पराजय यातील अंतर कमी असल्यास दुसऱ्यांदा मतमाेजणी हाेते. निवडणूक आयाेग १ हजार किंवा २ हजारपेक्षा कमी मतांचे अंतर असल्यास दुबार मतमाेजणी केल्यास बिघडले कुठे?

गांधी परिवाराव्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीने पक्षनेतृत्व करावे, यावर राहुल गांधी भर देत आहेत. यामुळे सुधारणा हाेईल काय ?

अखिल भारतीय काँग्रेसच्या बैठकीत अध्यक्ष कुणाला निवडले जाईल, हे मी सांगू शकत नाही. कुणीही निवडणूक लढवू शकताे. राहुल गांधी यांनी गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला प्राधान्य देण्याचे जाहीर केले आहे. सीडब्ल्यूसीने अध्यक्ष निवडण्यासाठी एआईसीसीचे अधिवेशन बाेलावण्याची इच्छाही व्यक्त केली हाेती.

२३ नेत्यांनी हायकमांडला लिहिले पत्र, आत्मचिंतन झाले पाहिजे ?

आत्मचिंतन पंचायतपासून तेे ब्लॉक स्तरापर्यंत झाले पाहिजे. सीडब्ल्यूसीने २४ अाॅगस्टच्या बैठकीत आत्मचिंतनाची बाब स्वीकारली हाेती. जिथपर्यंत पत्राचा विषय हाेता. त्याविषयी पक्षात मंथन सुरु आहे. कधीकधी हा विषय सार्वजनिक होताे. यात विशेष असे काही नाही.राष्ट्रीय स्तरावर भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस व्यतिरिक्त अन्य काेणता पक्ष नाही. बाकी सर्व पक्ष प्रादेशिक आहेत. काँग्रेसला माहीत आहे की, भाजपशी दाेन हात करण्यासाठी कसून तयारी करावी लागेल.काँग्रेसमध्ये अंतर्गत लाेकशाही पद्धतीने राजनीती अधिक मजबूत होईल.तशी अंतर्गत व्यवस्था भाजपात आहे काय?

ग्लोबल न्युज नेटवर्क: