मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भरसभेत म्हणाले देवेंद्रजी सॉरी ; वाचा सविस्तर
मुंबई : ‘मोठ्या मोठ्या शहरात लहान लहान गोष्टी घडत असतात’, हा प्रसिद्ध डायलॉग तुम्हाला माहीतच असेल. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात केलेल्या विधानामुळे ‘बडे बडे “भाषण” में ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है’, असंच तुम्हीही म्हणाल. कारण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भर सभेत माफी मागितली.
निमित्त होतं पंढरपूर पालखी मार्गाच्या भूमीपूजनाचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
रुढ पद्धतीप्रमाणे त्यांनी व्यासपीठावर उपस्थित सर्वांना नमस्कार केला आणि तितक्यात आपल्याला देवेंद्र फडणवीसांचा विसर पडल्याचं मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांची माफी मागत त्यांनाही नमस्कार केला. ते म्हणाले, देवेंद्रजी, सॉरी, तुमचे नाव घ्यायचेच राहिले. महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते आणि आमचे सहकारी देवेंद्रजी” आणि यानंतर त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
दरम्यान, या कार्यक्रमाला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह केंद्रीय तसेच राज्य मंत्रिमंडळातील काही सदस्य आणि अन्य नेते उपस्थित होते.