“बृजभूषण सिंहांच्या कार्यक्रमाला ५ लाख नाही, तर फक्त २५०० लोक” – मनसे

 

विविध नेत्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा पुढे ढकलला असला, तरी युवा नेते प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे. यातच राज ठाकरे अयोध्येत पोहोचले नसले, तरी मनसे नेते अविनाश जाधव काही कार्यकर्त्यांसह ५ जूनला अयोध्येला पोहोचले. त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी बृजभूषण सिंह यांच्या दावा खोडून काढला असून, त्यांच्या कार्यक्रमाला ५ लाख नाही, तर केवळ २५०० जण जमल्याचे मनसेने म्हटले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येत येतील त्यादिवशी बृजभूषण सिंह यांनी समर्थकांसह शरयू स्नानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला तब्बल पाच लाख लोक जमतील, असा दावा बृजभूषण सिंह यांनी केला होता. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतरही बृजभूषण सिंह आपल्या भूमिकेवर ठाम होते. राज ठाकरे यांना विरोध करण्यासाठी आयोजित केलेले त्यांचे सर्व कार्यक्रम नियोजनानुसार पार पडले होते.

शरू नदीवरील आपल्या फेसबुक लाइव्हमध्ये अविनाश जाधव म्हणाले की, आम्ही शरयू नदीच्या काठावर गेलो होतो. तिथे फारतर १०० ते १५० लोक जमले होते. त्यानंतर कार्यक्रम सुरु होईपर्यंत याठिकाणी दोन-अडीच हजारांचीच गर्दी जमली होती, असा दावा अविनाश जाधव यांनी केला. या सगळ्यावरुन बृजभूषण सिंह यांची ताकद किती आहे, हे समजले.

राज ठाकरे यांच्या सभेला त्यांना ऐकण्यासाठी लाखो लोक येतात. पण बृजभूषण सिंह यांना पाच लाख लोक येतील असा दावा करून त्याठिकाणी प्रत्यक्षात दोन-अडीच हजार जणच आले. अयोध्येत असताना तेथील अनेक लोकांशी, साधू-महंतांशी संवाद साधला. या सगळ्यांना राज ठाकरेंनी अयोध्येत यावे, असे वाटत असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले.

 

Team Global News Marathi: