राज्यात बुधवारी कोरोनाची रेकॉर्ड ब्रेक वाढ; जवळपास 60 हजार नवे रुग्ण,322 मृत्यू
ग्लोबल न्यूज – राज्यात आज कोरोना रेकॉर्ड ब्रेक आकडेवारी समोर आली आहे. आज, बुधवारी दिवसभरात राज्यात तब्बल 59 हजार 907 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आजवरची राज्यातील ही सर्वाधिक एकदिवसीय रुग्णवाढ आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील पाच लाखांच्या पुढे गेली आहे.
आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 31 लाख 73 हजार 261 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 26 लाख 13 हजार 627 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
आज 30 हजार 296 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.36 टक्के एवढं झाले आहे.
राज्यात आज 59907 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 30296 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2613627 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 501559 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.36% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 7, 2021
राज्यात सध्या 5 लाख 01 हजार 559 नव्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 322 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 56 हजार 652 जण कोरोनामुळे मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.79 टक्के एवढा आहे.
सध्या राज्यात 25 लाख 78 हजार 530 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 21 हजार 212 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 11 लाख 48 हजार 736 नमूने तपासण्यात आले आहेत.