अफगाणिस्तानात हाहाकार आणि पळापळ २०० च्यावर हिंदुस्थानी काबूलमध्ये अडकले

 

नवी दिल्ली | तालिबानी दहशतवाद्यांनी काबूलवर कब्जा मिळविल्यानंतर अफगाणिस्तानात अक्षरशः अराजक माजले असून लुटालूट, पळापळ आणि अफरातफरी सुरू आहे. विदेशी दूतावासातील नागरिक आणि बंदुकीच्या दहशतीखाली असलेली अफगाणी जनता या सर्वांनाच अफगाणिस्तानाबाहेर पडायचे आहे.

या परिस्थितीमुळे सोमवारी काबूल विमानतळावर बसस्थानक, लोकल रेल्वे स्टेशनप्रमाणे प्रचंड गर्दी उसळली. विनातिकीट, विनाव्हिसा लोक विमानात घुसत होते, लटकत होते. यावेळी चेंगराचेंगरी झाली. अमेरिकन सैन्याने हवेत गोळीबार केला. दरम्यान, चेंगराचेंगरीत किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकन सैन्य 21 वर्षांनंतर अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर काही दिवसांतच हा देश तालिबानी दहशतवाद्यांच्या अंमलाखाली सहजरित्या गेल्याचे अवघ्या जगाने पाहिले. रविवारी तालिबानने राजधानी काबूलवर ताबा मिळवून राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले.

रविवारीच राष्ट्रपती अशरफ गनी आणि उपराष्ट्रपती अमीरूल्लाह सालेह हे अफगाणिस्तानातून गुपचूप पसार झाले. तालिबान्यांनी देश ताब्यात आल्याची घोषणा करताच अफगाण नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. तालिबानी दहशतवादी रस्त्यावर गोळीबार आणि लुटालूट करीत आहेत. महिला घरातच लपून बसले आहेत.

सध्या अफगाणिस्तान रिपब्लिक स्टेट आहे, लवकरच इस्लामिक स्टेट होईल. तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दूल गनी बरादर हा राष्ट्रपती होण्याची शक्यता आहे. तालिबनचा म्होरक्या हिब्तुल्लाह अखुंदजादा याचेही नाव चर्चेत आहे. त्यानंतर इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान अशी अधिकृत घोषणा होईल.

Team Global News Marathi: