भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांच्या घरासमोर लाखोंचा खजिना सापडल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. प्रसाद लाड यांच्या घराबाहेर पैशांनी भरलेली एक बॅग सापडल्याची माहिती समोर आली आहे. या बॅगेत रोकड, चांदी, सोने, चांदीच्या मुर्ती, देवादिकांच्या मुर्ती आहेत. सुरक्षारक्षकांनी लाड यांना यासंदर्भात माहिती देताच त्यांनी तात्काळ पोलीसांकडे धाव घेतली.
माटुंगा येथे प्रसाद लाड यांचे निवासस्थान आहे. सदर बॅग पहाटेच्या सुमारास लाड यांच्या घरासमोर सापडली. सुरुवातीला बॅग अनोळखी असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले होते. याप्रकरणी पोलीस अजून तपास करत आहेत. अशाप्रकारे आमदारांच्या घरासमोर ही बॅग ठेवल्याने संशय व्यक्त केला जात आहे. आमदारांच्या निवासस्थानाला विशेष सुरक्षा असून देखील हा प्रकार कसा घडला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लाड यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही पोलीस तपासत आहेत. लवकरच यामागे कोण आहे हे निष्पण्ण होईल असा पोलिसांचा अंदाज आहे. आज आषाढी एकादशी. आणि आजच्याच दिवशी पहाटे ही बेवारस बॅग सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही बॅग कोणाची, कोणी ठेवली, का ठेवली याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.