मुंबई: भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहूतील अधीश या बंगल्याची मुंबई महानगरपालिकेकडून सोमवारी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काहीवेळापूर्वीच महापालिकेच्या आठ अधिकाऱ्यांचे पथक नारायण राणे यांच्या बंगल्याच्या दिशेने रवाना झाले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर जाण्यापूर्वीच हे पथक सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गेले होते. याठिकाणी या पथकाकडून पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली असून महानगरपालिकेचे पथक आज नारायण राणे यांच्या बंगल्यावर कारवाई करणार का, हे पाहावे लागणार आहे. गेल्यावेळी पालिकेचे अधिकारी राणे यांच्या अधीश बंगल्यावर आले होते. परंतु, त्यावेळी कोणीही बंगल्यात नसल्याने पालिकेचे अधिकारी नोटीस चिकवटून परतले होते. मात्र, आज पालिकेचे अधिकारी पूर्ण तयारी करून आल्याची चर्चा आहे. याठिकाणी पालिका अधिकाऱ्यांकडून अनधिकृत बांधकामाबाबत तपासणी आणि मोजमाप होण्याची शक्यता आहे. सध्या नारायण राणे स्वत: जुहूतील बंगल्यावर आहेत. त्यामुळे पालिकेच्या पथकाने कारवाई केल्यास नारायण राणे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये सध्या सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या युद्धातील प्रमुख शिलेदार नारायण राणे यांना मोठा धक्का बसला आहे. नारायण राणे यांच्या कोकणातील निलरत्न या बंगल्यावर हातोडा पडण्याची दाट शक्यता आहे. यावर आता राणे कुटुंबीय काय कायदेशीर कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे.