मुंबई | महाराष्ट्रातील भाजपचे चार केंद्रीय नेते सोमवारपासून महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. यामध्ये अनेक भागात नव्यानं झालेले केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या यात्रेचं नियोजन केले. लोकांशी संवाद साधण्यासोबतच केंद्रातील योजनांची माहिती देखील ते जनतेला देणार आहेत. त्यातच आज पासून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जण आशीर्वाद दौरा मुंबईतून सुरु होणार आहे.
मात्र दुसरीकडे नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी मुंबईत भाजपने लावलेले पोस्टर्स मनपाने काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या या कारवाई दरम्यान पोलीस आणि मुंबई मनपा कर्मचाऱ्यांसोबत भाजपच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची सुद्धा झाल्याचं पहायला मिळालं. नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी मुंबईत विविध ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून पोस्टर्स, होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.
माहिम भागांत लावण्यात आलेले पोस्टर्स मनपा कर्मचाऱ्यांनी काढायला सुरूवात केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे मंत्री झाल्यानंतर प्रथमच मुंबईत येत आहेत. त्यात नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांना मोदी सरकारने जनतेत जाऊन आशीर्वाद घेण्यास सांगितले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुंबईतून आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करत असून याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.